भुसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भाजपाच्या हिरे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पालकमंत्री दादा भुसे यांच्या निषेधार्थ आणि बोरी आंबेदरी धरणातून काढण्यात येत असलेला बंद कालवा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी मालेगाव येथील चाळीसगाव फाटा येथे सर्वपक्षीयांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, भुसे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बंदिस्त कालवा रद्द करावा, यासाठी 7 नोव्हेंबर 2022 पासून धरण क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱयांनी धरणावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ मौजे दहिदी येथील आंदोलक शेतकरी गणेश कचवे यांनी शनिवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांच्या भावनांचा अनादर करून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा अट्टहास केला जात असल्याने पालकमंत्री भुसे यांचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या निषेधार्थ व प्रकल्प रद्द करण्यासाठी सोमवारी, 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.