शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे बळ दे! मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे

सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरही उपस्थित होते

सुनील उंबरे, पंढरपूर

राज्यातील शेतकऱ्यासाठी सरकारने कर्जमाफी केली. मात्र शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती मिळू दे अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाला केली.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठ्ठल मंदीराच्या सभागृहात मानाचे वारकरी दांपत्य परसराम उत्तमराव मेरत आणि सौ. अनुसया परसराम मेरत यांचा सत्कार करण्यात आला. श्री मेरत (वय ५४ वर्षे) आणि सौ. मेरत (वय ४५ वर्षे) रा. बाळसमुद्र ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

महापूजनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षी मी, श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस पाडण्याचे साकडे घातले होते. गेल्यावर्षी श्री विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात भरभरून पाऊस झाला, शेतक-याचे उत्पादनही भरभरून आले. राज्य शासनाने नुकताच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाला बळ द्यावे अशी मागणी विठ्ठल चरणी केली.
विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही सदस्यपदे रिक्त आहेत. या पदावरील नियुक्ती करताना वारकरी संघटनांशी चर्चा करूनच केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेचा मान मिळालेला मेरत दांपत्याचा सत्कारही केला. पंधरा हजार रूपयाचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला तर सौ. दिपाली भोसले यांनी सौ. अमृता फडणवीस यांचा सत्कार केला. मंदीर समितीचे नूतन अध्यक्ष अतुल भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्षा  साधना भोसले, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी  व्यासपीठावर उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या