बेजबाबदार चंपत राय यांना ट्रस्टवरून त्वरित हटवा, राममंदिर जमीन घोटाळ्यावर शंकराचार्य बरसले

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. या आरोपावरून राजकारण चांगलेच तापलेले असतानाच शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरित पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे. तर रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या गंभीर आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरकारने ट्रस्ट तर बनवला, पण त्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेतले. चंपत राय आहेत तरी कोण? यापूर्वी त्याचे नाव कुणीही ऐकलेले नाही. तरीही त्यांना राममंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा करण्यात आले.- शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

नरसिंहपूर जिह्यातील परमहंसी गंगा आश्रमात शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राममंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला. मंदिर निर्मितीसाठी जी रक्कम गोळा करण्यात आली त्यातून महागडय़ा किमतीने जमीन खरेदी केली जात आहे. त्यावर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आमच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचे आरोप सुद्धा झालेत आम्ही कसलीच परवा करत नाही, असे सांगतात. त्यांचे हे म्हणणेच बेजबाबदारपणाचे असून अशा लोकांना ट्रस्टवरून त्वरित हटवावे, अशी मागणी शंकराचार्य यांनी केली.गोहत्या बंदी लागू करण्यासाठी ज्यावेळी यांचे दोन खासदार होते तेव्हा हे लोक आग्रही होते. पण, जेव्हा खासदारांची संख्या 200 झाली तेव्हा गोहत्या बंदी विसरूनच गेले, असे शंकराचार्य म्हणाले.

राममंदिर ट्रस्टने केवळ 5 मिनिटांत 2 कोटींची संपत्ती 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. जगात कुठेही इतकी महागडी जमीन मिळणार नाही. हे आरोप गंभीर असून याची चौकशी झाली पाहिजे.- आचार्य सत्येंद्र दास, रामलल्लाचे मुख्य पुजारी

शुभ मुहूर्तावर शिलान्यास नाही

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शिलान्यास समारंभाच्या तिथीवर सुद्धा आक्षेप नोंदवला. मंदिराचे शिलान्यास अत्यंत अशुभ मुहूर्तावर करण्यात आले. आम्ही आधीच त्याचा विरोध केला होता, पण कुणी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच आता बुद्धी भ्रष्ट झाल्याची उदाहरणे पुढे येत आहेत, असे शंकराचार्य म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या