दिल्लीत ‘जय जवान, जय किसान!’ प्रजासत्ताकदिनी जवानांच्या परेडनंतर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर परेड

यावर्षीचा प्रजासत्ताकदिन वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला होईल. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत होणार असून, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमणार आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लष्करी छावणीचे रूप आले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोदी सरकारने मनमानी पद्धतीने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी 61 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत.

 प्रजासत्ताकदिन परेडचे अंतर कमी होणार

– कोरोना प्रोटोकॉलचे पालन प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यावेळी करण्यात येईल.

– राजपथावरील भव्य लष्करी संचलनावेळी प्रतिवर्षी लाखो नागरिकांची उपस्थिती असते. यावेळी कोरोनामुळे केवळ 25 हजार नागरिकांची हजेरी असेल. ही परेड प्रतिवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यापर्यंत असणार नाही, तर नॅशनल स्टेडिअमपर्यंत ही परेड जाईल.

– सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जाईल.

– 150 वर सीसीटीव्ही, लष्करी जवान आणि सहा हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

अशी असणार ट्रॅक्टर परेड

  • सिंघू-टिकरी आणि गाझीपूर सीमेवरून हजारो ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करतील.
  • ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज तिरंगा असेल तसेच देशभक्तीपर गीते लावण्यात येणार आहेत.
  • ट्रॅक्टरवर शेतकरी महिला असणार आहेत. या ट्रॅक्टर परेडपुढे शेतकरी असतील.
  • राजपथावर प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर दिल्लीत ट्रॅक्टर परेड निघेल. सुमारे शंभर किलोमीटरची ही परेड असेल.
  • ही परेड शांततापूर्ण असेल, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.
  • तिन्ही सीमांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर परेडचा मार्ग निश्चित केला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या