संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा कायम राखूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गारपीट, निसर्ग चक्रीवादळ आणि बेमोसमी पाऊस, बर्ड प्ल्यू अशा संकटाच्या मालिकांशी सामना करीत आपण पुढे वाटचाल करीत आहोत. कोविड काळात राज्याला आर्थिक फटका बसला. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या सर्व संकटाशी नेटाने आणि निर्धाराने आपण लढत आहोत. संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा आपण कायम राखू याचा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिवाकर रावते, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह विविध देशांचे कौन्सुलेट जनरल, भूदल, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, कोरोनो योद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. सलामीसाठी झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्र पोलीस ब्रास बॅण्ड, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल आणि बृहन्मुंबई अश्वदल या मर्यादीत दलांनी सहभाग घेतला. मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगविषयक नियमांचे यावेळी पालन करण्यात आले. ध्वजवंदन आणि भाषणानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ असा मराठीचा गौरव करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून राज्यपालांनी आपले संपूर्ण भाषण मराठीतून केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीचे हे एकसष्ठावे वर्ष आहे. गेल्या एकसष्ट वर्षात कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. जानेवारी महिन्यापासूनच जगभरात कोविड-19 विषाणूचा प्रसार होत होता, महाराष्ट्रात कोविड-19 चा पहिला रुग्ण मार्च महिन्यात सापडला. पण या विषाणूच्या प्रादुर्भावाची चाहूल लागताच राज्य शासनाने अतिशय जबाबदारीने कोविड विरोधातील लढाई लढत कोविडचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले, याकरिता राज्यातील सर्व कोविड योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो.

गेल्या वर्षभरातील नऊ महिन्यांहून अधिक काळ आपण कोविड विषाणूविरोधात एकजुटीने लढत आहोत. सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसून येत असली तरी आपल्याला अजूनही सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्य शासनाने आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले. तरी परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने आरोग्य यंत्रणेबरोबर सतर्क राहून रात्रंदिवस काम केले आहे. त्यामुळेच 2020 हे वर्ष संपत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात आपल्या सर्वांसाठी आशादायी झाली आहे. येणाऱ्या काळातही धैर्य दाखवून आपल्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात आपण सामाजिक अंतराचे नियम पाळणे, मुखपट्टी सतत लावणे, हातांची स्वच्छता ठेवणे याला प्राधान्य देत आपण सर्वांनीच स्वयंशिस्त पाळून नवी जीवनशैली स्वीकारुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोविडबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान आपण यशस्वीरित्या राबविले. सुमारे ३ कोटी घरांपर्यंत पोहचून तसेच सुमारे 12 कोटी व्यक्तींची माहिती याकाळात आपण संकलित केली. राज्यातील कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जंबो उपचार सुविधांची निर्मिती, कोविड चाचण्यांचे दर 5 पट कमी करण्याबरोबरच राज्यात विक्रमी वेळेत सुमारे ५०० खाजगी आणि शासकीय प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला. महाराष्ट्रात आता कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.

शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. बळीराजाला कर्जमुक्त करण्याबरोबरच चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ एक वर्षापूर्वी आपण लागू केली आहे. आतापर्यंत ३० लाखांहून जास्त खातेदारांना सुमारे २० हजार कोटी रुपयांचा लाभ आपण दिला आहे. राज्य शासनाकडून अलिकडे ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा व पीकनिहाय १ हजार ३४५ मूल्य साखळी विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. शासनाकडून हमीभावाने गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. तर पहिल्यांदाच रब्बी हंगामातही भरड धान्य खरेदी यावेळी करण्यात आली, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

महाराष्ट्र सरकार संत गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार काम करीत आहे. संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार हे शासन काम करीत आहे. गरजूंसाठी कोविड काळात शिवभोजन थाळीची किंमत फक्त 5 रुपये करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 900 हून अधिक शिवभोजन केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. त्याचा अडीच कोटीहून अधिक गरजूंनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे हे मुद्दाम वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, हे माझ्या शासनाचे फार मोठे यश आहे. लॉकडाऊन काळात सुमारे 10 लाखांहून अधिक बांधकाम आणि माथाडी कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित आणि इतर राज्यातील मजुरांसाठी निवारा केंद्राबरोबरच बांधकामांच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना भोजन देण्यात आले, असे राज्यपाल म्हणाले.

राज्यातील होतकरु तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शासन तत्पर आहे. तरुणांना त्यांच्या स्टार्टअपना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन अर्थसहाय्य देत आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. या क्षेत्रात नवा उद्योग सुरु करताना आता ७० ऐवजी फक्त 10 परवाने आवश्यक असतील. याशिवाय शेतकऱ्यांना कृषिपूरक व्यवसाय उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी ‘कृषी पर्यटन धोरण’ जाहीर करण्यात आले आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. राज्य शासनाने राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरु केले आहे. तर मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आरे दूध वसाहतीतील सुमारे 808 एकर जमीन राखीव वने म्हणून घोषित केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन केल्याने ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनामार्फत ‘शक्ती’ कायदा तयार करण्यात येत आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलात महिलांच्या पहिल्या स्वतंत्र बटालियनला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी असणाऱ्या ‘नरिमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोड’ प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यातील मेट्रो सेवा लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे लोकल रेल्वे सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना एकमेंकाशी जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लवरकच कार्यान्वित होणार आहे. या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी मार्ग वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे संपूर्ण राज्यात क्लस्टर योजना लागू करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रातील घर खरेदीच्या मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्राला तेजी मिळण्याबरोबरच राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बसण्यास मदत होत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या काळात २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आठ दशकानंतर सातबारामध्ये बारा प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. वॉटरमार्क, युनिक कोड अशा विविध बदलांमुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातींमधील विद्यार्थ्यांना 26 हजार रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे. मराठा युवकांसाठी ‘सारथी’ अधिक बळकट करण्यात येत आहे. तर इतर मागासवर्ग, विजाभज आणि विमाप्र या प्रवर्गासाठी ‘महाजोती’ प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्याकरिता ‘अमृत’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’, असे नमुद करुन राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एकसंघ राहील. सर्वच घटकातील विचारांच्या समाजघटकांना सोबत घेऊन, सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन प्रगत, पुरोगामी, समर्थ आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करीत आहे. देशाच्या राज्यघटनेप्रती आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करुया आणि एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक अशा नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देशाच्या प्रजासत्ताकाच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या