हिंदुस्थानी लष्कर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम, राष्ट्रपतींचा चीनला इशारा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी कुरापतखोर चीन आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांना स्पष्ट संदेश दिला. शांततेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम आहोत, तरीही भूदल-वायुदल आणि नौदल आपल्या सुरक्षितते विरोधात होणारे कुठलही दु:साहस निष्फळ करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्जं आहेत. कुठल्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

ते म्हणाले, ‘गेल्यावर्षी अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आपल्यासमोर आली. आपल्याला आपल्या सीमांवर विस्तारवादी कारवायांचा सामना करावा लागला. पण आपल्या शूर जवानांनी ते प्रयत्न हाणून पाडले. यात आपले 20 जवान हुतात्मा झाले. आपण सगळे देशवासीय त्या जवानांचे कृतज्ञ आहोत. खरे तर आपण शांततेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहोत, तरीही आपलं भूदल-वायुदल आणि नौदल आपल्या सुरक्षितते विरोधात होणारं कुठलही दु:साहस निष्फळ करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्जं आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत. भारताचा हा ठाम आणि तत्वावर आधारलेला दृष्टिकोन, संपूर्ण जगाला पूर्णपणे ठाऊक आहे.’

देशवासियांना दिल्या शुभेच्छा

जगातली सर्वात मोठी आणि चैतन्यानं सळसळती लोकशाही असलेल्या आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना, बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा. विविधतेनं समृद्ध असलेल्या आपल्या देशात अनेक सण साजरे होतात, पण त्याचबरोबर आपले राष्ट्रीय सणही, आपण सर्व देशवासीय, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं ओथंबून साजरे करतो. प्रजासत्ताक दिनाचा हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतानाच आपला राष्ट्रध्वज आणि राज्यघटने प्रति, आम्ही सन्मान आणि निष्ठा व्यक्त करत आहोत. हा प्रजासत्ताक दिन, देश-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. याच दिवशी 71 वर्षांपूर्वी, आपण सर्व हिंदुस्थानींनी आपले हे‌ अद्वितीय संविधान स्वीकारले, त्याची अंमलबजावणी सुरु केली आणि ते अक्षरश: स्वतःमध्ये भिनवले. त्यामुळेच तेव्हापासून आपल्या सर्वांना या संविधानाच्या मुलभूत जीवनमूल्यांवर सखोल विचार करण्याची, या दिनानिमित्तानं एक संधी मिळत असते. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनमूल्यं आम्हा सर्वांसाठी पवित्र आदर्श आहेत. अशी अपेक्षा आहे की फक्त शासन व्यवस्थेतले जबाबदार लोकच नाहीत, तर आपण सर्वसामान्य नागरिकांनीही या आदर्शांचं, सर्वशक्तिनिशी निष्ठेनं पालन करायला हवे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

देशप्रेमाला सलाम

ज्याप्रमाणे मेहनती शेतकरी देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखण्यात यशस्वी झाले आहेत, त्याचप्रमाणे सैन्याचे शूर जवान कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचे संरक्षण करत आले आहेत. लडाखमध्ये सियाचीन आणि गलवान खोऱ्यात उणे 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानात सर्व काही गोठवून टाकणाऱ्या थंडीपासून, ते जैसलमेर मधल्या 50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षाही जास्त असलेल्या तापमानात चटके देणाऱ्या उष्ण हवामानात, जमीन-आकाश आणि दीर्घ लांबीच्या अशा सागरी किनारी क्षेत्रात, आमचे सैनिक देशाच्या संरक्षणाची जबाबदारी, क्षण न क्षण पार पाडत आहेत. आमच्या सैनिकांचं शौर्य, देशप्रेम आणि बलिदान यांचा आम्हा सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो, असे राष्ट्रपती म्हणाले.

फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपुढे नतमस्तक

गेल्यावर्षी संपूर्ण मानवजात, एका विक्राळ अशा संकटाचा सामना करत असताना जणू स्तब्ध झाली होती. कोरोनाविषाणूरुपी शत्रु विरोधात सर्व देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन, त्याग, सेवा आणि बलिदानाचा अनुकरणीय आदर्श घालून देत एकमेकांचे रक्षण केले आहे. सर्व डॉक्टर-परिचारिका-आरोग्य सेवक, आरोग्यसेवेशी संबंधित प्रशासक आणि सफाई कर्मचारी यांचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले की, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांची देखभाल केली आहे. याच प्रयत्नात कित्येकांनी आपले प्राणही गमावले. या बरोबरच या महामारीने देशातल्या सुमारे दीडलाख नागरिकांचे बळी घेतले. अशा सर्व शोकग्रस्त कुटुंबीयांप्रति राष्ट्रपतींनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच कोरोना विरुद्धच्या या लढाईत आघाडीचे योद्धे म्हणून सामान्य नागरिकांनीही असामान्य योगदान दिले आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीतले लोक जेव्हा या कालखंडाचा इतिहास जाणून घेतील, तेव्हा, या आकस्मिक संकटाचा ज्या साहसाने आपण सर्वांनी सामना केला आहे, त्यापुढे ते अत्यंत श्रद्धापूर्वक नतमस्तक होतील, असे राष्ट्रपती म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या