
प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली.
लाख आव्हाने येवोत, बलशाली प्रजासत्ताक करूया!
असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले हिंदुस्थानी प्रजासत्ताक आणखी बलशाली करूया. लाख आव्हाने येवोत, त्यांना परतवून लावण्याची हिंमत बाळगूया, त्यासाठी आपण वज्रमूठ करूया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुस्थानी प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाचे हे वैभव मिरवतानाच आपण येणाऱया पिढय़ांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल यासाठी निर्धार करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे यासाठी थोर स्वातंत्र्यसेनानींसह अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केला. अगणित अशा वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्यांना अभिवादन करताना विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील एकात्मता अखंड रहावी यासाठी वचनबद्ध व्हावे लागेल. आव्हाने तर येतातच, मग ती नैसर्गिक असोत की मानवनिर्मित त्यांना परतवून लावण्याची हिंमत आपल्याला बाळगावी लागेल. त्यासाठी सर्वांना एकजुटीने, एकदिलाने काम करावे लागेल. वैभवशाली अशा या हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवताना आपल्याला त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल यासाठी काळजी घ्यावी लागेल. नैसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण आणि मानवाचा विकास यांचा समतोलही साधावा लागेल. त्यासाठी आपण निर्धार करूया. यातूनच आपले हिंदुस्थानचे प्रजासत्ताक आणखी बलशाली होईल असा विश्वास आहे. त्यासाठी आणि हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱया, त्याग, समर्पण करणाऱया शूरवीरांना विनम्र अभिवादन!
…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!
‘महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सर्वेच्च नागरी पुरस्कार मिळवणारे सन्मानार्थी हे समृद्ध महाराष्ट्राचे वैभव आहेत. त्यांच्या पुरस्कारांनी महाराष्ट्राच्या गौरवात भरच पडली आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पद्म पुरस्कार सन्मार्थींचेही अभिनंदन केले.