10 हजार हेक्टर जमीनीचे सेंद्रिय शेतीत रूपांतर करणार – सत्यपाल मलीक

602

प्रत्येक नागरिकाने एकतेची भावना आणि राज्याची शांतता आणि जातीय सलोखा टिकवून ठेवावा. तसेच घटनेत आत्मसात केलेले आदर्श साध्य करण्यासाठी लोकांना एकत्रित प्रयत्न, सहकार्य, समर्पण आणि गतिशीलता देण्यास प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी पणजीतील कांपाल परेड मैदानावर आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर केले. कृषी क्षेत्राचा सक्षम विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषी उत्पादनाचा व्यापार वाढविण्यासाठी आंबा, काजू यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्य सरकारने आता सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. सुमारे 10 हजार हेक्टर जमीन सेंद्रिय शेती लागवडीखाली आणण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.

राज्यपाल मलीक यांनी गोवा हे देशातील जलदगतीने विकास साधणारे राज्य असल्याचे सांगितले. सामाजिक, शारीरिक, औद्योगिक, पर्यटन, क्रीडा सुविधा आणि कनेक्टीविटी अशा क्षेत्रात गोवा विकसीत झाल्याचे ते म्हणाले. गोव्यात महत्वपूर्ण पायाभूत सुविधा आहेत आणि गोव्याला लवकरच स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायास चालना मिळेल व सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईल असे ते म्हणाले. राज्याने औषध उद्योगाचा पाया स्थापित केल्याचे नमूद करून जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा ज्ञानाधिष्ठीत उद्योगांसाठी उद्ययोन्मुख स्थळ म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले.

सक्षम विकासाची उद्दीष्ठे पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे. नीती आयोगाने प्रसिध्द केलेल्या एसडीजी इंडिया इंडेक्स 2019-20 मध्ये राज्य 7 व्या क्रमांकावर आहे ही गोव्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मलीक यांनी सांगितले. इनोव्हेशन, हवामान बदल आणि जलसंपत्तीसंबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपालांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरीक केलेल्यांना पुरस्कार प्रदान केले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गावस यांना 2017-18 मध्ये पोलीस प्रशिक्षणात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबगद्दल केंद्रिय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले. सहाय्यक विभागिय अधिकारी अजित कामत यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाले. उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक स्टेशन फायर अधिकारी मार्वीन बॉस्को फेर्रांव यांना देण्यात आले. लिडिंग फायर फायटर रोहिदास परब आणि लिडिंग फायर फायटर प्रकाश कन्नाईक यानाही राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाली आहेत. राज्यपाल मलीक यांनी मानवंदना स्वीकारली आणि लष्कर, नौदल, तटरक्षक दल, कर्नाटक पोलीस, गोवा पोलीस, गृहरक्षक, एनसीसी छात्र आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाची पाहणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार फ्रांसिस सिल्वेरा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, ॲड जनरल देवीदास पांगम, मुख्यसचिव परिमल राय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, सरकारचे सचिव, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि खात्यातील प्रमुख उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राज्यातील विविध शाळांतील नृत्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. मल्ल खांब हे आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.

आपली प्रतिक्रिया द्या