24 जानेवारीचा बंद शांततेत पार पडेल – प्रकाश आंबेडकर

678

वंचित बहुजन आघाडीने सीएएविरोधात 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन दादर येथे ज्याप्रमाणे शांततेत आंदोलन झाले त्याचप्रमाणे महाराष्ट्र बंदही शांततेत पार पाडला जाईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत देशाच्या आर्थिक दिवाळखोरीसंदर्भात तसेच 24 जानेवारीच्या बंदसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर होणार आहे. त्यादरम्यान 3 लाख कोटी न जमल्यास शासन चालविण्यासाठी लागणारा निधीही सरकारकडे राहणार नाही. लोक व्यवहार करीत नाही आणि व्यवहार करीत नसल्याने शासनाला जो महसूल हवा आहे तो मिळत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 24 जानेवारी रोजी होणारा बंद शांततेत होईल. अनेक बँकांच्या संघटनांनी सहभागी होण्याचे कबूल केले आहे. एनआरसीमुळे 40 टक्के हिंदू बाधित होतील. त्यांची नावे आम्ही देणार आहोत. मुस्लिम लोक आधीच जागरूक झाले असल्याने त्यांची माहिती यामध्ये नसल्याचे आंबेडकर म्हणाले. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्राचा कायदा लागू होतो ही गोष्ट खरी आहे, पण राज्यांना वेगळे मत मांडण्याचा अधिकार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या