पोलीस आयुक्तांविरुद्ध बंडाची खोटी बातमी दिली, रिपब्लिकच्या चारजणांवर गुन्हा

बनावट टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या रिपब्लिक टीव्हीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण करणारे, आयुक्तांविरुद्ध पोलीस बंडाचे बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादकासह चारजणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 येथील सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांच्या तक्रारीवरून रिपब्लिक टीव्हीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या अँकर शिवानी गुप्ता, रिपोर्टर सागरिका मित्रा व शावन सेन, कार्यकारी संपादक निरंजन नारायण स्वामी, संपादकीय स्टाफ व न्यूज रूम इन्चार्ज यांच्या विरोधात पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पवार यांच्या तक्रारीनुसार, रिपब्लिक इंग्रजी वृत्तवाहिनीवर 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पोलीस दलाची बदनामी करणारे वृत्त दाखविण्यात आले. पोलीस दलात आयुक्तांविरोधात प्रचंड असंतोष आहे. अधिकारी आयुक्तांविरोधात बंडाच्या पवित्र्यात आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना आयुक्तांचे आदेश मान्य नाहित. अशा आशयाचे वृत्त शिवानी गुप्ता व सागरिका मित्रा यांनी दिले.

शिवाय हे वृत्त शावन सेन याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. या निराधार वृत्तामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्या बदनामीकारक वृत्ताचे रेकॉर्डिंग

रिपब्लिक इंग्रजी वृत्त वाहिनीवर झालेल्या पोलीस दलाविरोधातील वार्तांकनाचे रेकॉर्डिंग विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये करण्यात आले आहे. त्या रेकॉर्डिंगची डीव्हीडीची प्रत तसेच इंग्रजी कार्यक्रमाचे केलेले शब्दांकन शशीकांत पवार यांनी ना.म.जोशी मार्ग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या