गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा दिग्गज कलाकारांची हजेरी

सामना प्रतिनिधी । पणजी

दिग्गज कलाकारांची हजेरी, दर्जेदार मराठी सिनेमा आणि आगळ्या वेगळ्या उद्धाटन सोहळ्यामुळे विन्सन वर्ल्डतर्फे 28, 29 आणि 30 जून रोजी आयोजित यंदाचा 12 वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव विशेष ठरणार आहे.महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून प्रतिनिधी नोंदणीला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी दिली.

12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय शेट्ये म्हणाले,यंदाच्या महोत्सवाचे स्वरूप उद्धाटन सोहळ्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.फक्त मराठी या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या चॅनलच्या संयुक्त विद्यमाने यंदा 28 जून रोजी आगळा वेगळा उद्धाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.तीन तासांच्या उद्धाटन सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज आणि नामवंत कलाकार आपली कला पेश करणार आहेत. उद्धाटन सोहळ्यात दरवर्षीच्या कृतज्ञता पुरस्कारा बरोबरच चतुरस्र अभिनेता,चतुरस्रअभिनेत्री,विशेष गौरव,फक्त मराठी अभिमान,समाजरत्न आणि कला गौरव पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

फक्त मराठीचे बिझनेस प्रमुख श्याम मळेकर यांनी यंदाच्या महोत्सवात फक्त मराठीची भूमिका मांडली. मळेकर यांनी गोवा मराठी चित्रपट महोत्सवा सोबत जोडण्याची संधी मिळाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. मळेकर म्हणाले,यंदाच्या उद्धाटन सोहळ्यात पुरस्कार वितरण आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा चांगला मिलाफ बघायला मिळणार आहे. त्यासाठी दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचे चित्रीकरण फक्त मराठी वाहिनीवरुन तीन वेळा केले जाणार आहे.

28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळय़ात प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुमित्रा भावे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना चतुरस्र अभिनेता, अभिनेत्री, फक्त मराठी अभिमान पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, कला गौरव, विशेष गौरव या विभागात पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार असल्याची माहिती फक्त मराठीचे व्यवसाय प्रमुख श्याम मळेकर यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्यात शशिकांत केरकर, संतोष पवार, पंढरीनाथ कांबळे, रमेश वाणी, किशोरी आंबिये, कमलाकर सातपुते यांचे धमाकेदार सादरीकरण होणार आहे. याशिवाय मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशिष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे यांची दिलखेचक नृत्ये प्रेक्षकांना बसल्या जागी ताल धरायला लावणार आहेत असे मळेकर यांनी पुढे सांगितले.

या महोत्सवात चित्रपट कलाकारांची मांदियाळी असणार आहे. या महोत्सवासाठी मेघा धाडे, सई ताह्मणकर, श्रुती मराठे, सई देवधर, दिलीप प्रभावळकर, नागराज मंजुळे, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी,नेहा महाजन, रिंकू राजगुरू, सोनल अरोरा, कृतिका तुळसकर, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, आदी दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.

12व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील चित्रपट कला अकादमी, मॅकॅनिझ पॅलेस, आयनॉक्स आणि वास्को येथील 1930 येथे दाखविण्यात येणार आहेत अशी माहिती मोघे यांनी यावेळी दिली.

गोमचिम गौरव सोहळा सर्व गोमचिम प्रतिनिधींसाठी खुला आहे.सोमवार पासून पणजी, मडगाव,वास्को,फोंडा आणि म्हापसा येथे प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेट्ये म्हणाले.

१२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील चित्रपट

मुळशी पॅटर्न (दिग्दर्शक प्रवीण तरडे)
बस्ता (दिग्दर्शक तानाजी धाडगे)
होडी (दिग्दर्शक गजेंद्र अहीरे)
नाळ (दिग्दर्शक सुधाकर रेड्डी)
वेडींगचा सिनेमा (दिग्दर्शक सलिल कुलकर्णी)
कागर (दिग्दर्शक मकरंद माने)
सुर सपाटा (दिग्दर्शक मंगेश काथाकाळे)
भोंगा (दिग्दर्शक शिवाजी पाटील)
दिठी (दिग्दर्शक सुमित्रा भावे)
इमेगो (दिग्दर्शक करण चव्हाण)
खटला बिटला (दिग्दर्शक परेश मोकाशी)
म्होरक्या (अमर देवकर)
मिरांडा हाउस (दिग्दर्शक राजेंद्र तालक)
पाणी (दिग्दर्शक आदिनाथ कोठारे)
चुंबक (दिग्दर्शक संदीप मोदी)
आरोन (दिग्दर्शक ओमकार शेट्टी)
अहिल्या (दिग्दर्शक राजू पार्सेकर)

४ लघुपट होणार प्रदर्शित
यावेळी चार लघुपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत. यामध्ये पाम्फलेट(दिग्दर्शक शेखर रणखांबे), पोस्टमार्टम (दिग्दर्शक विनोद कांबळे), गोधुल(दिग्दर्शक गणेश शेलार), आई शप्पथ (दिग्दर्शक गौतम वझे) यांचा समावेश आहे.