वायूसेनेच्या महिला पायलटने वाचवले दोन अधिकाऱ्यांसह सहा गिर्यारोहकांचे प्राण

53

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लडाखमध्ये गिर्यारोहणासाठी आलेल्या सहा गिर्यारोहकांचे प्राण वायूसेनेच्या महिला पायलटने दाखवेलल्या प्रसंगावधानने वाचले आहेत. फ्लाईट लेफ्टनंट सुरभी सक्सेना असे या महिला पायलटचे नाव असून लडाख डोंगरपायथ्यापासून तब्बल 17000 फूट उंचीवर असलेल्या स्टोक कांगडी शिखरावर दोन लष्करी अधिकाऱ्यांसह सहा पर्यटक बर्फवृष्टीत अडकले होते. त्यांना सुरभी व कॅप्टन अॅन्वी लवासा यांनी सुखरुपपणे तेथून बाहेर काढले. सर्वात कठीण असे हे रेस्क्यू ऑपरेशन होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवावर खेळत या महिला पायलटने त्यांचे प्राण वाचवले. या घटनेतील थराराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लडाखवरील स्टोक कांगडी शिखरावर चढाई करण्यासाठी 18 गिर्यारोहकांचा एक गट आला होता. सर्वजण शिखर चढत असतानाच अचानक वातावरण बदलले आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. यावेळी जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने दोरीला पकडत शिखर चढणाऱ्या सहा गिर्यारोहकांचा तोल गेला व ते थेट खाली घसरले आणि बर्फात अडकले. या दरम्यान इतर गिर्यारोहक मात्र पुढे निघून गेले होते. त्यातील एकाने मागून येणारे सहाजण नसल्याचे टीमच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी बेसकॅम्प मधील सहकाऱ्यांना फोन करून तातडीची मदत मागवली. नंतर त्या सहा जणांना वाचवण्यासाठी आयोजकांनी 100 जणांना पाठवले. पण बर्फवृष्टीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही. यामुळे वातावरणातील बदलाची वाट पाहण्याशिवाय रेस्क्यू टीमुढे दुसरा पर्याय उरला नाही.

यादरम्यान बेसकॅम्पमधील आयोजकांनी वायूदलाला मदत करण्याची विनंती केली. बर्फवृष्टी होत असल्याने तांत्रिकदृष्टया या भागात हेलिकॉप्टर उडवणे शक्य नव्हते. पण तरीही वायूदलाने बर्फवृष्टीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले. हे हेलिकॉप्टर महिला पायलट चालवत असल्याचे बघून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यानंतर या बर्फवृष्टीत अडकलेल्या व जखमी झालेल्यांना घेऊन हेलिकॉप्टर मागे परतले. यात लष्करातील दोन अधिकारी कॅप्टन अंकित सिरोही आणि नौदल कमांडर सुभीर कुमार सिंह यांचाही समावेश आहे.

Embed Video

आपली प्रतिक्रिया द्या