
आर्थिक वादातून स्वारगेट एसटी स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या सहा वर्षीय चिमुरडीची स्वारगेट पोलिसांच्या पथकाने सोलापूर येथून सुखरूप सुटका केली. तर, अपहरणनाट्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना अटक केली असून मुख्य आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.
रेश्मा समीर शेख (30, कात्रज, मूळ. रा. सोलापूर), वैशाली पोशटी शिंदे (सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. तर, मुख्यसुत्रधार महिला करिश्मा गोटुराम काळे (वय 20,रा. चिखली,जि. सोलापूर) हिचा शोध सुरू आहे. याबाबत अंजली सिद्धेश्वर शिंदे (वय 21,रा. क्रांतीनगर हनुमान टेकडी,ता. लोणावळा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानक परिसरात घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली व करिश्मा या दोघी नातेवाईक असून दोघींत आर्थिक व्यवहारातून वाद होते. यातूनच करिश्मा हिने तिच्या इतर दोन साथीदार महिला वैशाली व रेश्मा यांना सोबत घेत अंजली यांच्या मुलीचे स्वारगेट बसस्थानक परिसरातून अपहरण केले. अंजली ही पंढरपूरला तिच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी निघाली असताना, स्वारगेट बसस्थानक परिसरात आली होती. यावेळी ही घटना घडली. याबाबत अंजली हिने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी वैशाली व रेश्मा या दोघींना तात्काळ अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत करिश्मा मुलीला घेऊन तिच्या आई-वडिलांच्या सोलापूर येथील मोहळ या गावी गेल्याचे सांगितले. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत मुलीची सुटका केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक येवले, प्रकाश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.