कोरोनाची लस लठ्ठ लोकांवर प्रभावी ठरणार नाही; संशोधकांचा दावा

643

कोरोना संकट जगभरात थैमान घालत आहे. जागतिक संकट असलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनेक देश औषधे आणि लस शोधत आहेत. त्यात हिंदुस्थान, ब्रिटन,रशिया, अमेरिका आणि इस्त्रायल या देशांच्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. तर आपली लस तयार असल्याचा दावा रशियाने केला आहे. ही लस किती प्रभावी ठरणार, याबाबत अमेरिका आणि ब्रिटनने साशंकता व्यक्त केली आहे. तर कोरोनावरील कोणतीही लस लठ्ठ लोकांवर प्रभावी ठरणार नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संसर्गजन्य साथ रोखण्यासाठी याआधी आलेल्या लस लठ्ठ लोकांवर प्रभावी ठरल्या नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेतील अलबामा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत अभ्यास करून हा दावा केला आहे. हॅपेटायसीस बी आणि फ्लू रोखण्यासाठी आलेल्या लस लठ्ठ लोकांवर फारशा प्रभावी ठरल्या नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या रोगांच्या लसीमुळे लठ्ठ लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नसल्याने त्यांच्यावर या लस प्रभावी ठरल्या नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

लठ्ठ व्यक्तींमध्ये टी आकाराच्या पेशी योग्य प्रकारे काम करत नाही. या पेशीच संक्रमणविरोधी अँटीबॉडी तयार करण्याचा संदेश देतात. लठ्ठ व्यक्तींमध्ये या पेशीच योग्य प्रकारे काम करत नसल्याने अँटीबॉडी तयार होत नाहीत. तसेच लठ्ठ व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी असलेल्या लसीने काही लठ्ठ व्यक्तींच्या शरीराला सूज येऊ शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे. तसेच लठ्ठ व्यक्तींच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सूईचा आकारही महत्त्वाचा असल्याचे संशधकांनी सांगितले. लठ्ठ व्यक्तींसाठी दीड इंचापेक्षा लांब सूई वापरल्यास लठ्ठ लोकांच्या शरीरातील मांसल भागापर्यंत लस पोहचते. कोरोनाची लस लठ्ठ व्यक्तींसाठी फारशी प्रभावी ठरणार नसली तरी, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या