रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी राजीनामा दिला, वर्षभरात राजीनामा देणारे तिसरे उच्चपदस्थ अधिकारी

1180

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी राजीनामा दिला आहे. तब्येतीचं कारण पुढे करत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. महागाई दर आटोक्यात ठेवणं, कोसळणाऱ्या जीडीपीला सावरणं ही आव्हाने असताना विश्वनाथन यांनी राजानीमा देणं हे रिझर्व्ह बँक प्रशासनाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या बातमीत म्हटलं आहे की 31 मार्चला विश्वनाथन हे आपलं पद सोडणार आहेत. जवळपास 40 वर्षांची कारकीर्द असलेले विश्वनाथन हे जून महिन्यात खरंतर निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी मुदतीआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. ताणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं त्यांनी राजीनाम्यासाठी कारण दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचंही सांगण्यात येत आहे. सध्या देश ज्या आर्थिक परिस्थितीतून जात आहे ते पाहता सध्याच्या घडीला विश्वनाथन यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची निकडीची गरज आहे.

1981 साली विश्वनाथन यांच्या रिझर्व्ह बँकेतील सेवेला प्रारंभ झाला होता. बँकींग क्षेत्रातील उत्तम जाणकार म्हणून त्यांची ख्याती आहे. खासकरून या क्षेत्रासंबंधीचे नियम आणि कायदे हे त्यांच्याइतकं कोणी चांगलं जाणत नाही. त्यांच्या कौशल्यामुळेच माजी गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. विश्वनाथन हे बँकीन नियंत्रण, सहकार क्षेत्रातील बँकींग आणि खात्यांच्या विमा क्षेत्रावर लक्ष ठेवून होते. जून 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला होता. त्यापूर्वी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर  2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. पटेल यांची नियुक्ती रघुराम राजन यांच्याजागी करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या