रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दणका, नियम मोडल्याप्रकरणी दीड कोटींचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 11 जून रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आरबीआयने घालून दिलेल्या कर्ज संदर्भातील काही नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका सेंट्रल बँक ऑफ इंडियावर ठेवण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि आगाऊ रकमेसह ग्राहक संरक्षण संदर्भात काही नियम लागू केले आहेत. पण, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 नुसार आरबीआयने बँकेविरोधात सुमारे 1 कोटी 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक स्थितीविषयी रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2022 रोजी तपासणी केली होती. त्यात आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आरबीआयने नोटीस जारी करून याविषयी खुलासा मागितला होता. मात्र, नोटिसीला मिळालेलं उत्तर आणि सुनावणी दरम्यान दिलेल्या युक्तिवादानंतर आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियावरील आरोप सिद्ध होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता सुमारे दीड कोटींचा दंड बँकेला भरावा लागणार आहे. मात्र, या सगळ्याचा बँकेच्या नेहमीच्या व्यवहारांवर कोणताही प्रभाव होणार नाही. तसंच, कोणताही व्यवहार करण्यात अडचण येणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.