रेपो रेटमध्ये वाढ, कर्जे महागणार

रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपोरेटमध्ये वाढ केली आहे. 35 बेसिक पॉईंटने वाढ केल्यामुळे रेपोरेट 5.90 वरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कारलोन, गृहकर्जासह सर्व कर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होईल. महागाईचा भडका आणखी उडणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत पाच विरुद्ध एक सदस्य या बहुमताने रेपो रेटच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला. गव्हर्नर दास यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत सलग पाच वेळा रेपोरेटमध्ये वाढ केली आहे. मे महिन्यात पतधोरण जाहीर करताना 40 बेसिक पॉईंटने रेपो रेट वाढविला होता. त्यानंतर चार वेळा यात वाढ केल्यामुळे रेपो रेट तब्बल 2.25 टक्क्यांनी वाढला आहे.

खिशावर भार पडणार
देशाची शिखर बँक असलेली आरबीआय इतर सर्व बँकांना रेपो रेटच्या दरानुसार कर्ज देते. त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास बँकांकडून ग्राहकांना देणाऱया कर्जाचे व्याजदर वाढतात. रेपो रेटचा थेट परिणाम कर्जदाराच्या खिशावर होतो.