बँकांचे बुडीत कर्ज आणखी वाढणार! रिझर्व्ह बँकेच्या अहवालात 2020 धोक्याचे

423

अर्थव्यवस्थेतील मंदी, पतपुरवठय़ातील घसरण, थकीत कर्जापोटी बँकांना करावी लागणारी तरतूद आदी कारणांमुळे आगामी नऊ महिन्यांत बँकांच्या ‘ग्रॉस एनपीए’मध्ये अर्थात बुडीत कर्जामध्ये वाढ होण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. सप्टेंबर 2019 मध्ये बँकांचे ग्रॉस एनपीएचे प्रमाण 9.3 टक्के होते. सप्टेंबर 2020 पर्यंत हे प्रमाण 9.9 टक्क्यांपर्यंत वाढेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेकडून वर्षातून दोन वेळा सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये देशभरातील बँकांच्या फायनान्शिअल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर) जाहीर करण्यात येतो. रिझर्व्ह बँकेने आपआपला अहवाल जाहीर केला आहे त्यात वाढत्या बुडीत कर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने काय म्हटले आहे?

  • बडय़ा कंपन्यांजवळ सध्या नगदी पैशांची कमतरता नाही. या कंपन्यांना कर्जाची सध्या आवश्यकता नाही. त्यामुळे क्रेडिट ग्रोथमध्ये घसरण होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. सप्टेंबर 2019 मध्ये सरकारी बँकांचा क्रेडिट ग्रोथ 8.5 टक्के होता, तर खासगी बँकांचा हा दर 16.5 टक्के होता.
  • कर्जांची परतफेड न झाल्यामुळे कर्ज वसुलीवर पाणी सोडावे लागणारी रक्कम याचाही ताण बँकांच्या ताळेबंदावर वाढण्याची शक्यता आहे.
  • सप्टेंबर 2019 मध्ये सरकारी बँकेत बुडीत कर्ज 12.7 टक्के होते. सप्टेंबर 2020 मध्ये 13.2 टक्क्यांवर जाईल. खासगी बँकांचे बुडीत कर्ज 3.9 टक्क्यांवरून 4.2 टक्के इतके वाढेल. विदेशी बँकांच्या बुडीत कर्जामध्ये 2.9 टक्क्यांवरून 3.1 टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असा अंदाज आहे.
आपली प्रतिक्रिया द्या