पेट्रोल पंपावर महिला चालकांसाठी राखीव जागा, राज्यातील पहिला प्रयोग चंद्रपुरात

एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्यसरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ चंद्रपुरातील खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बस मध्ये महिला प्रवाशांसाठी 50 टक्के सूट दिली आहे. महिलांच्या सन्मानासाठी आता मोठी पाऊलं उचलली जात आहेत. नेहमी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होतं असते. पुरुष आणि महिला वाहन चालक एकाच रांगेत राहून पेट्रोल भरण्यासाठी उभे असतात. पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळतात यात महिला वाहन चालकांना त्रास होतं असतो. त्यामुळे चंद्रपुरातील मिलिंद कोतपल्लीवार या पेट्रोल पंप मालकाने महिलांसाठी पेट्रोल पंपावर खास राखीव जागा ठेवली आहे. इथं केवळ महिला वाहन चालक आपल्या वाहनात पेट्रोल भरू शकतात. गर्दी मध्ये महिलांना होत असलेल्या अडचणी मुळे कोतपल्लीवार यांनी हा उपक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाचे महिलांसोबतच जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.