धोकादायक इमारतीवर रहिवाशांनीच टाकला हातोडा

सामना ऑनलाईन । ठाणे

धोकादायक म्हणून जाहीर केलेली इमारत पाडण्यासाठी महापालिकेने तब्बल 22 लाख रुपये खर्च सांगितल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी स्वतःच या इमारतीवर हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. याची कुणकुण लागताच पालिकेचे पथक तोडकाम करण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले. मात्र आम्ही तुम्हाला एक रुपयाही देणार नाही, आमची इमारत आम्हीच पाडू, असे सांगत रहिवाशांनी अधिकाऱयांना अक्षरशः पिटाळून लावले.

डोंबिवली औद्योगिक विभागातील शंकर-पार्वती ही तळ अधिक एक मजला ही 30 वर्षांपूर्वीची इमारत असून तेथे 16 कुटुंबे राहतात,  पण ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने पावसाच्या तोंडावर सुरुवातीला कारवाई करण्यास विरोध करत रहिवाशांनी पावसाळ्यानंतर इमारत रिकामी करू असे सांगितले. त्यावर औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. पालिकेनेही पाणी व वीज तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाइलाजाने काळजावर दगड ठेवत रहिवाशांनी आपली घरे रिकामी केली. हे दृष्टचक्र कमी की काय म्हणून  पालिका प्रशासनाने इमारत तोडण्यासाठी चक्क या रहिवाशांकडूनच 22 लाख रुपये उकळण्याचा डाव आखला.

इतके पैसे आणणार कुठून?

इमारत तोडल्यानंतर तेथे नवीन घर मिळेल या आशेवर रहिवासी असताना पालिकेने तोडकामासाठी अवाचे सवा खर्च सांगितल्याने सर्वांनाच धक्का बसला. इतके पैसे आणणार कुठून? असा प्रश्न त्यांना पडला. अखेरीस सर्वांनी वर्गणी गोळा करत स्वतःच इमारत पाडण्यास   सुरुवात केली आहे. याची माहिती मिळताच ‘ई’ प्रभाग समितीचे अधिकारी रवींद्र गायकवाड आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी इमारत पाडण्यास सुरुवात केली. मात्र त्याला विरोध करत रहिवाशांनी पथकाला हुसकावून लावले.

पालिका कोणतेही शुल्क आकारत नाही!

रवींद्र गायकवाड यांनी मात्र धोकादायक इमारत पाडण्यासाठी पालिका कोणतेही शुल्क आकारत नाही. शंकर-पार्वती इमारतीतील रहिवाशांना  पैशांचा आकडा कोणी सांगितला हे आम्हाला माहिती नाही असे सांगून  त्यांनी कानावर हात ठेवले. दरम्यान, या मोक्याच्या भूखंडावर काही भूमाफियांचा डोळा असून पालिका अधिकारी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप या इमारतीतील रहिवाशांनी केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या