मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम ग्रामस्थांनी रोखले

66

सामना ऑनलाईन,मालवण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मालवण तालुक्यात चिंदर-त्रिंबक गावात साडेपाच किलोमीटर लांबीचा आणि १० मीटर रुंदीचा एकमेव रस्ता मंजूर झाला. सुमारे ३ कोटी रुपये खर्चाच्या या रस्ता योजनेच्या कामाचे भूमिपूजन महिन्याभरापूर्वी करण्यात आले होते. मात्र या रस्त्यासाठीचे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत इथल्या ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखून धरले आहे. पूर्वी या रस्त्याची रूंदी ४ मीटर इतकी होती तो रस्ता १० मीटर रूंद करण्याची योजना आहे. यासाठी ग्रामस्थांनी जमिनी देण्याची तयारीही दाखवली होती. त्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने वागायला लागला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

chinder-village-road-1

इथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय की रुंदीकरणात बाधित होणारी ग्रामस्थांच्या जागेतील कुंपणे ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने हटवली जात आहेत. याच मुद्दावरून चिंदर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीवरून तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी काही मागण्या देखील केल्या. मनमानी पद्धतीने तोडण्यात आलेल्या कुंपणांसाठी नुकसान भरपाई देण्यात यावी, पाणी वाहून जाण्यासाठीचे पाईप रस्ता काम सुरू असताना टाकले जात आहेत. हे पाणी शेतीमध्ये घुसून शेतीचं नुकसान होऊ नये या ग्रामस्थांच्या दोन प्रमुख मागण्यात आहेत. तसेच कुंपणांची मोडतोड केल्याबद्दल ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

हा रस्ता त्रिंबक सापळा ते  चिंदर चर्च असा असून याची लांबी साडेपाच मीटर इतकी आहे. या रस्त्यासाठी २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पाच टक्के ज्यादा खर्चाची मागणी करण्यात आली आहे. या  कामासाठी मूळ ठेकेदार  वेगळा असून दोन पोट ठेकेदार काम करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या