केरळ राज्याचं नाव बदलणार; ‘केरळम’ करण्याचा ठराव विधानसभेत

kerala-cm-Pinarayi-Vijayan

केरळ विधानसभेने हिंदुस्थानच्या राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची आणि सर्व अधिकृत नोंदींमध्ये राज्याचे नाव ‘केरळम’ असे बदलण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी विधानसभेत ठराव मांडला. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ विरोधकांनी त्यात कोणत्याही सुधारणा सुचवल्या नाहीत.

मल्याळम भाषेत राज्याचे नाव ‘केरळम’ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारे राज्यांची स्थापना झाली. मल्याळम भाषिक समुदायांसाठी एक संयुक्त केरळ बनवण्याची गरज राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून प्रकर्षाने जाणवत होती. पण संविधानाच्या पहिली अनुसूचीत आपल्या राज्याचे नाव केरळ असे लिहिलेले आहे.”

‘ही विधानसभा एकमताने केंद्र सरकारला राज्यघटनेच्या कलम 3 अन्वये ‘केरळम’ म्हणून दुरुस्ती करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती करते. हे सभागृह सुद्धा विनंती करते की आमच्या भूमीचे नाव संविधानाच्या आठवी अनुसूचीत बदलून ‘केरळम’ असे नाव देण्यात यावे’, असे ते म्हणाले.