गणपती विसर्जन खाणीत न करण्याचा पावडे हदगाव ग्राम पंचायतीचा ठराव

420

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने नदी नाल्यांमध्ये पाणीच उपलब्ध नाही आणि खाणीमध्ये जेमतेम उपलब्ध असलेले पाणी जनावरांना पिण्यासाठी लागणार असून मूर्ती विसर्जन केल्यास पाणी पूर्ण अशुद्ध होणार असल्याने हदगाव ग्राम पंचायतीने यावर्षी खाणीमध्ये गणपती मूर्ती विसर्जन करू न देण्याचा ठराव घेतला आहे. या ठरावाची प्रत दे सेलू पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे  यावर्षी गणेश मंडळांना गणपती विसर्जनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपूर्वी तालुक्यातील मोरेगाव येथील नदीत सेलूसह ग्रामीण भागातील  गणपती मूर्तींचे विसर्जन केले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून नदीत पाणी नसल्याने पावडे हदगाव जवळील खाणीमध्ये मुबलक पाणी असल्याने तेथे सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन केले जात होते. विशेष म्हणजे पावडे हदगाव येथील तरुण मंडळी देखील रात्रभर थांबून मोफत सेवा देऊन गणेश मूर्ती विसर्जनासाठी सहकार्य करीत असतात. परंतु या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे. त्यातच यावर्षी खाणीमध्ये पाणी कमी झाले आहे. सेलू शहरात दरवर्षी 65 ते 70 नोंदणीकृत गणेश मंडळे असतात. त्यांच्या मूर्ती देखील 5 ते 10 फुटांपर्यंत उंचीच्या असतात. असंख्य घरगुती गणेश मूर्तींही येथे विसर्जनासाठी येतात. तसेच पंचक्रोशीतील ग्रामीण भागातूनही अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी पावडे हदगाव येथील खाणीत येतात. यामुळे दरवर्षी खाणीतील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते.

त्यामुळे पहिल्यांदाच गणपती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून सेलू नगर परिषद आणि पोलिसांनी कृत्रिम तलावाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या