मुंबई शहरात विश्रांती, उपनगरात सरीवर सरी! अजून दोन दिवस पावसाचा इशारा

मुंबईला आठवडाभरापासून झोडपणाऱ्या पावसाने मुंबई शहरात शुक्रवारी थोडी विश्रांती घेतली असली तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरात मात्र सरीवर सरी कोसळल्या. मुंबईत अजून दोन दिवस वादळी पाऊस होणार असून ताशी 70 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. शिवाय दुपारी 12.24 वाजता 4.71 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पालिकेकडून मुंबईकरांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

18 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्या

शुक्रवारी पडलेल्या पावसात शहरात 6, पूर्व उपनगरात 5 व पश्चिम उपनगरात 7 अशा एकूण 18 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या.

सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना

– शहरात 4, पूर्व उपनगरात 1 व पश्चिम उपनगरात 2 अशा सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कोणालाही मार लागला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा झाला पाऊस

मुंबई शहर 4.84 मिमी
पूर्व उपनगर 21.75 मिमी
पश्चिम उपनगर 16.02 मिमी

  • हवामान विभागाने येत्या 24 तासांत जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अधूनमधून सोसाटय़ाचा वारा 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने तर काही ठिकाणी 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या