60 वर्षांवरील व्यक्तींना सरावासाठी `नो एण्ट्री’, बीसीसीआयचा सुरक्षेसंबंधीचा 100 पानी रिपोर्ट

458

बीसीसीआयने रविवारी झालेल्या बैठकीत खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षेची काळजी घेत क्रिकेट सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. यासाठी 100 पानी रिपोर्ट तयार करण्यात आला. यामध्ये सर्व प्रकारच्या सूचना करण्यात आल्या असून ट्रेनिंग सुरू करण्याआधी खेळाडूंना संमती पत्रावर सही करावी लागणार आहे. तसेच सराव शिबिरात 60 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. यामध्ये कोच, सपोर्ट स्टाफ, अधिकारी यापैकी कोणत्याही 60 वर्षांवरील व्यक्तीचा समावेश असणार नाही.

सर्व संघांना 20 ऑगस्टला यूएईला रवाना व्हावे लागेल
आयपीएलच्या गव्हर्निंग समितीच्या बैठकीत रविवारी आयपीएलच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता नव्या वेळापत्रकानुसार 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे दोन दिवस वाढवण्यात आले तसेच पहिल्यांदाच स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार नसून तो मंगळवारी होणार आहे. तसेच संध्याकाळच्या लढती आता आठऐवजी 7.30 वाजता सुरू होतील. दहा लढती दुपारी खेळवण्यात येतील. या सर्व बाबींसह या समितीकडून एक महत्त्वाची बाब संघ मालकांना सांगण्यात आली आहे. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी 20 ऑगस्टला यूएईकडे रवाना व्हायला हवे. काही संघ 10 ते 18 ऑगस्ट या कालावधीत तेथे रवाना होणार होते, पण सुरक्षेसाठी सर्व संघांनी एकत्र रवाना होणे गरजेचे आहे असे समितीकडून सांगण्यात आले आहे. संघ मालकांनी या सूचनेचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमधील खेळाडूंसाठी 14 दिवसांत चार कोरोना टेस्ट
बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठीही नियम तयार करण्यात आले आहेत. यानुसार आयपीएलमधील क्रिकेटपटूंना 14 दिवसांत चारवेळा कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच ड्रेसिंग रूममधील संख्या नियंत्रित असणार आहे. शिवाय खेळाडूंची पत्नी, गर्लफ्रेण्ड, फ्रेन्चायझी मालक या सर्वांनाच नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच संपूर्ण प्रकिया झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला बाहेर जावे लागल्यास त्या व्यक्तीला पुन्हा आतमध्ये प्रवेश देता येणार नाही.

बीसीसीआयच्या रिपोर्टमधील महत्त्वाचे मुद्दे
सराव सुरू होण्याआधी मेडिकल टीम खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफकडून मागील दोन आठवड्यांबाबतची मेडिकल हिस्ट्री व ट्रॅव्हलसंबंधित माहिती घेणार
खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफपैकी कोणालाही कोरोनाचे लक्षण दिसत असेल तर त्या व्यक्तीला पीसीआर टेस्टला सामोरे जावे लागेल. अशा प्रसंगी तीन दिवसांत दोन चाचणींचा त्या व्यक्तीला सामना करावा लागणार आहे.
दोन्ही चाचणींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूला ट्रेनिंगमध्ये सहभागी होता येणार आहे.
खेळाडूंना स्टेडियममध्ये एन ९६ मास्क लावणे बंधनकारक असेल. मात्र त्यावर रोस्पिरेटर नसावे.
सार्वजनिक ठिकाणी जाताना खेळाडूंना चष्मा लावावा लागणार आहे.
ट्रेनिंग सुरू होण्याआधी खेळाडूंसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मेडिकल ऑफिसरकडून कोरोना प्रोटोकॉलबाबत माहिती देण्यात येईल.
खेळाडूंना स्वत:च्या गाडीमधूनच स्टेडियममध्ये ये-जा करावी लागेल.
खेळाडूंना चेंडूला लाळ लावता येणार नाही.
राज्य संघटनांना खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या