
राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा 91.25 टक्के इतका लागला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यंदा प्रथमच वाढीव वेळेच्या सवलतीशिवाय 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात आल्या. याचा परिणाम म्हणजे यंदा निकालही घटला आणि गुणवंतांची संख्यादेखील कमी झाली आहे. राज्याच्या निकालात कोकण मंडळ आणि मुलींचे वर्चस्व कायम आहे. मुंबई विभागीय मंडळाने यंदाही निराशाजनक कामगिरी केली असून मुंबईचा निकाल सर्वात कमी 88.13 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा मुंबईचा निकाल 2.78 टक्क्यांनी घटला आहे.
राज्यातील 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली. यांपैकी परीक्षा दिलेल्या 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात 2.97 टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.1 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 4.59 टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षेत 93.73 टक्के मुली, तर 89.14 टक्के मुले पास झाली आहेत.
यामुळे निकाल घटला….
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यंदा निकालात घट का झाली याविषयीची माहिती दिली. बोर्डाच्या मागील काही परीक्षा कोरोनामुळे वेगळय़ा वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांना 70, 80 आणि 100 गुणांच्या परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. शिवाय 75 टक्के अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा घेण्यात आल्या, परंतु यंदा 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी कोणताही वाढीव वेळ नव्हता. त्यामुळे एकूण निकाल आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये फरक पडला असल्याचे गोसावी म्हणाले. यंदा ज्याप्रमाणे नियमित परीक्षा झाली तशी परीक्षा वर्ष 2020 मध्ये घेण्यात आली होती. 2020 मध्ये 90.66 टक्के निकाल लागला होता, तर 2023 मध्ये 91.25 टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच 0.59 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के.
- दिव्यांगांची चमकदार कामगिरी 93.43 टक्के विद्यार्थी पास.
- रिपीटर्सचा निकाल 44.33 टक्के.
- पेपरफुटीप्रकरणी 11 गुन्हे दाखल, डमी विद्यार्थी 1, कॉपी करणारे 345, एकूण गैरप्रकार 1 हजारहून अधिक.
18 हजार 848 विद्यार्थ्यांना क्रीडा कोटय़ाचा लाभ, यातील 33 विद्यार्थी ट्रान्सजेंडर. - केवळ 7 हजार 696 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण. गेल्या वर्षी 10 हजार 47 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे होते.
- 1 लाख 31 हजार 561 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये पास, यातील सर्वाधिक 38 हजार 884 विद्यार्थी मुंबई विभागाचे.
बोर्डाच्या अध्यक्षांच्या मुलीला बारावी परीक्षेत 77.50 टक्के गुण
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी राज्यभरातील बारावीच्या 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. या विद्यार्थ्यांमध्ये गोसावी यांची मुलगीदेखील होती. संस्कृती गोसावीला बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 77.50 टक्के गुण मिळाले आहेत. संस्कृती बाणेर येथील आदित्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला इंग्रजी विषयात 86, भूगोल विषयाला 88 गुण, गणितामध्ये 69 गुण, भौतिकशास्त्र विषयात 55 गुण, रसायनशास्त्र विषयात 70 तर आयटी विषयात 97 असे एकूण 465 गुण मिळाले आहेत. संस्कृतीला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे असून तिला जेईई आणि जेईई अॅडव्हान्स या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. राज्याची सीईटी परीक्षासुद्धा तिने दिली आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत विद्यार्थ्यांना हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे.
हेल्पलाइन क्रमांक – 7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 899923229, 9321315928, 7387647902, 8767753069.
शाखानिहाय निकाल (राज्य)
शाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारी
- विज्ञान 649754 624363 96.09
- कला 387285 325545 84.05
- वाणिज्य 335804 303656 90.42
- एचसीव्हीसी 40274 35948 89.25
- आयटीआय 3 254 2956 90.84
टक्केनिहाय विद्यार्थी संख्या
- 90 व त्यापेक्षा जास्त 7 हजार 696
- 85 ते 90 19 हजार 569
- 80 ते 85 39 हजार 52
- 75 ते 80 65 हजार 356
- 70 ते 75 96 हजार 400
- 65 ते 70 1 लाख 31 हजार 413
- 60 ते 65 1 लाख 85 हजार 559
- 45 ते 60 5 लाख 83 हजार 271
- 45 पेक्षा कमी 1 लाख 79 हजार 927
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
- कोकण 96.01
- पुणे 93.34
- कोल्हापूर 93.28
- अमरावती 92.75
- नाशिक 91.66
- लातूर 90.37
- नागपूर 90.35
- मुंबई 88.13