देशातील आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडवान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यंदा देशभरातून 48 हजार 248 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत. निकालात आयआयटी दिल्ली विभागातील वेद लाहोटी हा 360पैकी 355 गुणांसह प्रथम आला आहे. तर आयआयटी मुंबई क्षेत्रामधील द्विजा पटेल हिने 360पैकी 332 गुण मिळवीत मुलींमध्ये पहिली आली आहे. मुंबई आयआयटी क्षेत्रातून उज्ज्वल राजदीप मिश्रा हा विद्यार्थी पहिला आला आहे. त्याचा रँक देशात सहावा आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या वतीने 26 मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या 1 आणि 2 या दोन्ही पेपरला 1 लाख 80 हजार 200 विद्यार्थी बसले होते, यापैकी 48 हजार 248 विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामध्ये 40 हजार 284 मुले तर 7 हजार 964 मुली पात्र झाल्या आहेत. क्रमवारीत आयआयटी गुवाहाटी विभागातील अविक दास (रँक 69) आयआयटी कानपूरच्या मान्य जैन, आयआयटी भुवनेश्वर विभागातून मॅचा बालादित्य आणि आयआयटी मद्रासच्या भोगलापल्ली संदेश यांनी अनुक्रमे 75, 11 आणि 3 मिळून अव्वल स्थान पटकावले आहे. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी दिल्ली (2) आयआयटी रुरकी (1), मद्रास (2), आयआयटी मुंबई (3) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई अॅडव्हान्स समुपदेशन प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 5 टप्प्यात 10 जून ते 26 जुलैपर्यंत चालेल. एकूण 23 आयआयटी, 32 एनआयटीत प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे.
मुंबई तिसऱया स्थानावर
पात्र विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक पात्र विद्यार्थी मद्रास आयआयटी क्षेत्रातील आहेत. या आयआयटीमधील 11 हजार 180 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पहिल्या 10 टॉपमध्ये 1 विद्यार्थी आहे तर दुसऱया क्रमांकावर दिल्ली आयआयटी असून 10 हजार 255 विद्यार्थी पात्र आहेत. पहिल्या 10मध्ये 2 विद्यार्थी आहेत. आयआयटी मुंबईचे पहिल्या 10मध्ये 3 विद्यार्थी असून एकूण 9 हजार 480 विद्यार्थी पात्र आहेत.
टॉप टेन टॉपर्स
रँक विद्यार्थी गुण आयआयटी
1 वेद लाहोटी 355 आयआयटी दिल्ली
2 आदित्य 346 आयआयटी दिल्ली
3 भोगलपल्ली संदेश 338 आयआयटी मद्रास
4 रिदम केडिया 337 आयआयटी रुरकी
5 पुट्टी कुशल कुमार 334 आयआयटी मद्रास
6 राजदीप मिश्रा 333 आयआयटी मुंबई
7 द्विजा धर्मेशकुमार पटेल 332 आयआयटी मुंबई
8 कोदुरू तेजेश्वर 331 आयआयटी मद्रास
9 ध्रुवीन हेमंत दोशी 329 आयआयटी मुंबई
10 अल्लादबोईना 329 आयआयटी मद्रास
सिद्धिक सुहास