सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई पोलीस दलातील 1983 ची बॅच म्हणजे गुन्हेगारीचा बीमोड करणारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि धडाकेबाज अधिकाऱ्यांची बॅच. खात्यात असताना या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनसेवा केली. ज्यांना आवश्यकता असेल त्यांना मागेपुढे न पाहता मदतीचा हात दिला. आता निवृत्तीनंतरही त्या बॅचच्या काही अधिकाऱ्यांनी जनसेवेचे व्रत सोडलेले नाही. कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीला हे निवृत्त अधिकारी धावून गेले. अधिकाऱ्यांनी पेन्शनमधील शक्य तेवढी रक्कम जमा करून ती पूरग्रस्तांना देण्याचे काम केले आहे.

पोलीस अकादमीचे तत्कालीन प्राचार्य आणि कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार यांनी प्रशिक्षित केलेले 1983 बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांची वेगळीच ओळख आहे. त्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीचा बंदोबस्त करतानाच समाजसेवादेखील इमानेइतबारे केली. आज जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजसेवचा कसा सुरूच ठेवला आहे. या अधिकाऱ्यांनी याकेळी कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी आपापल्या परीने पूरग्रस्तांना विविध माध्यमातून मदत पुरवली, परंतु तरीदेखील काही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याच्या बातम्या टीव्ही तसेच सोशल मीडियातून पसरल्या आणि प्रफुल्ल भोसले, पोपट तिकाटणे, खंडेराक पाटील, यशवंत व्हटकर, डी. डी. कडमारे, धनराज दायमा, उत्तम खैरमोडे व त्यांचे सहकारी असे 15 अधिकारी पुढे सरसावले. त्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करायचे ठरवले आणि आपल्या पेन्शनमधील रक्कम देऊन साडेपाच लाख रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष कोल्हापूरमधील निळेवाडी आणि सांगलीतील आमनापूर, बुरली आणि अंकलखोप या गावात धडक दिली. त्या गावातील गरजूंना प्रत्येकी 10 हजार रोख व कपडय़ांचे वाटप केले. तसेच अमनापूरच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.

खारीचा वाटा उचलल्याचे समाधान

या 15 अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅचमधील कोल्हापूर, सांगलीत राहत असलेल्या अधिकाऱ्यांकडून खरे गरजू कोण आणि कोणाला अद्याप मदत मिळालेली नाही याची माहिती मिळवली. त्यानंतर मग संबंधित गावांतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. आम्हाला फार मोठय़ा स्वरूपात मदत करता आली नसली तरी यथाशक्ती शक्य तेवढा मदतीचा हात आम्ही गरजू पूरग्रस्तांना दिला. या समाजकार्यातून आम्हाला खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान असून यापुढेदेखील आवश्यक तिथे गरजूंसाठी आम्ही उभे राहू, असे या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या