Blog – अलार्म काका आणि हसता खेळता वानप्रस्थाश्रम

>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘उठा उठा सकाळ झाली, चहापानाची वेळ झाली.’ सकाळी ठिक सव्वा सहा वाजता शिटी वाजली, की झोप नसलेल्या डोळ्यांना जागं होण्याची संधी मिळते आणि अंथरुणातून उठून थकलेली पावलं काठीचा आधार घेत भोजनालयाच्या दिशेने वळतात. पंचवीस जणांचे सामूहिक चहापान होते. मग तीच पावले पुन्हा आपापल्या खोलीत जातात. ठीक सात वाजता अंघोळीसाठी सोलारचे गरम पाणी, नऊ वाजता चहा-नाश्ता, साडे बारा वाजता जेवण, दुपारी चार वाजता चहा, संध्याकाळी साडेसात वाजता जेवण आणि रात्री साडेआठ वाजता दूध. असा असतो, अनगाव येथील वानप्रस्थी आश्रमाचा दिनक्रम.

भिवंडीच्या पुढे वाड्याच्या दिशेने एसटीने जाताना वाटेत लागते अनगाव. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातल्या धडपड्या नाना क्षीरसागर नामक तरुणाने 25 वर्षांपूर्वी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुमारे 13 एकर परिसरात एक गोशाळा उभारली आणि त्या पाठोपाठ अनगावातच एक बालकाश्रम सुरू केला. या दोन संस्था व्यवस्थित नावारूपाला आल्यावर त्यांनी वृद्धाश्रमाचा संकल्प 2005 साली सोडला आणि 2008 साली वानप्रस्थी आश्रमाची वास्तू उभारली गेली. नाना आता 88 वर्षांचे आहेत. आजही तरुणांना लाजवतील अशा पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांनी उभारलेल्या वानप्रस्थी आश्रमाच्या छायेत 30 वृद्ध विसावले आहेत.

22-23 निरोगी आणि 7-8 अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक, यांची शुश्रूषा करण्यासाठी 12 कर्मचारी आणि ही सगळी यंत्रणा सांभाळणारे व्यवस्थापक जयंत गोगटे, या सर्वांच्या प्रयत्नाचे फलित म्हणजे वृद्धाश्रमासारखी ‘पोक्त’ वास्तूदेखील ‘प्रसन्न’ वाटू लागते. वानप्रस्थी आश्रमात केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर तरुण, मध्यमवयीन मंडळीही दोन-तीन दिवस तेथील निवांतपणाचा अनुभव घेण्यासाठी आश्रमात जातात. तशी सोय आश्रमाने केली आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. म्हणून सण-उत्सव असो, नाहीतर सुटी, आश्रमात लोकांचा राबता सुरू असतो. पाहुण्यांचे आगत-स्वागत, देणगी, भेटवस्तू, मुक्कामी रहिवासी, नवीन रहिवासी या सर्वांची व्यवस्था योग्य रीतीने हाताळण्याचे काम गोगटे काका करतात. स्वत: वयाची पासष्ठी ओलांडूनही ते आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या मंडळींचा सांभाळ करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत.

गोगटे काका सांगतात, ‘आमच्या आश्रमातल्या सर्वात तरुण आजी 92 वर्षांच्या आहेत. त्याखालोखाल सत्तर-ऐंशी वयोगटातले इतर रहिवासी आहेत. जे अगदीच अशक्त आहेत अशा रहिवाशांना जागच्या जागी आम्ही सगळ्या सुविधा पुरवतो. बाकी इतर रहिवासी जेवण-खाण्याच्या वेळापत्रकापलीकडे छान गप्पा मारतात. गावात फेरफटका मारतात, गाणी ऐकतात. संध्याकाळी टीव्हीवर सामूहिकपणे मालिका पाहतात. एवढेच काय, तर एकमेकांशी भांडतातसुद्धा! आमच्या इथे महिन्यातून एकदा सांस्कृतिक कार्यक्रम असतो. कीर्तन, व्याख्यान, हास्यरंग, भावगीते अशा कार्यक्रमांमुळे रहिवाशांना थोडा बदल मिळतो. त्यानिमित्ताने गावकरीदेखील आश्रमात येतात. या सर्व गोष्टींमुळे आश्रमातील मंडळींना आपण दूर कुठेतरी एकाकी पडलो आहोत, ही भावना नष्ट होते. इथे शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. पण आवश्यक तिथे काही नियम शिथिलही केले जातात. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. विशेषत: उतारवयात हुकूमशाही सहन होत नाही. म्हणून थोडं संस्थेच्या कलाने, थोडं रहिवाशांच्या कलाने घेत वातावरण सुदृढ आणि निरोगी ठेवण्याचा आम्ही सगळेच सातत्याने प्रयत्न करतो.’

वानप्रस्थी आश्रमात वावरताना गोगटे काकांच्या प्रत्येक शब्दाचा प्रत्यय येतो. प्रशस्त वास्तू, स्वच्छता, फुला-पानांनी डवरलेली बाग, रहिवासी क्षेत्र असूनही पुरेशी शांतता आणि वेळच्या वेळी मिळणाऱ्या सुविधा यांमुळे कोणीही रहिवासी दुर्मुखलेले दिसत नाहीत. उलट त्यांना इथले वातावरण एवढे आवडते, की ते घरी परत जाण्यास तयार नसतात. मात्र, तब्येत अत्यवस्थ असेल किंवा वयोमानानुसार परावलंबित्व वाढत असेल, तर अशा रहिवाशांना नाईलाजाने परत पाठवावे लागते. पूर्वी तिथे केवळ चालते-फिरते लोक दाखल केले जात, परंतु अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या देखभालीची वाढती समस्या लक्षात घेता, त्यांच्यासाठी पहिला मजला राखीव ठेवण्यात आला आहे. रुग्णांची ने-आण करण्यासाठी लवकरच लिफ्टची सुविधाही सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त लोकांनी तिथे यावे, राहावे, वानप्रस्थी जीवन अनुभवावे या उद्देशाने दोन खोल्यादेखील कायमस्वरूपी राखीव ठेवल्या आहेत. रहिवाशांकडून तसेच मुक्कामी आलेल्या पाहुण्यांकडून त्यासाठी माफक शुल्क आकारले जाते.

मुलांनी चांगली वागणूक दिली नाही, म्हणून नाईलाजाने वृद्धाश्रमात येऊन राहणारे लोक आहेतच, परंतु अविवाहित, विधवा, विधुर किंवा मुलांच्या परदेशगमनानंतर किंवा त्यांच्या नोकरी, शिक्षणानंतर एकाकी पडलेले सधन आणि मध्यम वर्गीय लोक आपणहून वृद्धाश्रमाचा पर्याय निवडतात. वृद्धाश्रमाकडे बघण्याची लोकांची मानसिकता बदलत आहे. तरीदेखील कोणाचे पालक वृद्धाश्रमात आहेत, हे कळल्यावर सदर व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. वृद्धाश्रम या संकल्पनेचा पूर्णपणे स्वीकार होण्यासाठी अजून काही काळ लोटावा लागेल.

याबाबत विचारले असता गोगटे काका सांगतात, ‘वृद्धाश्रम ही संकल्पना आपल्याकडे शहरात हळूहळू रुजत आहे. कारण, बदलती जीवनशैली, छोटी घरं, विभक्त कुटुंब पद्धती, वादविवाद आणि जनरेशन गॅप या सर्व गोष्टींना भविष्यात आपल्यालाही सामोरे जावे लागणार आहे, याचा विचार तरुणांनी आताच केला पाहिजे. नव्हे, तर तशी जनजागृती केली पाहिजे. उतारवयात आधाराची गरज असताना मुलाबाळांनी नोकरी, व्यवसाय सोडून आपल्या उशाशी बसून राहावे, ही अपेक्षा चुकीची आहे. वाढती स्पर्धा, आर्थिक गणिते यांचा ताळमेळ घालताना तरुणांची त्रेधातिरपिट होते. अशा वेळी आपण आपली आणि समोरच्याची मानसिकता चांगली राहावी, म्हणून वृद्धाश्रमाचा पर्याय निवडण्यास काहीच हरकत नाही. दूर राहूनही नात्यांमधला ओलावा जपता येतो. त्यासाठी थोडा भावनिक विचार बाजूला ठेवून वास्तविक विचार व्हायला हवा.

‘इथे अ‍ॅडमिशन देताना आम्ही वृद्धांच्या नातेवाईकांना दोन आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा भेटायला येण्याची सक्तीदेखील करतो. फोनवर बोलायला सांगतो. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना आपण आपल्या परिवारापासून तुटलेलो नाही, ही जाणीव जगण्यास बळ देते. शिवाय इथे सर्व आवश्यक सोयी-सुविधा आहेत. आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी आहे. अशी जीवनशैली असताना एकलकोंडे आयुष्य निवडून शेवटचा प्रवास वेदनादायी का करावा? यासाठी लोकांची मानसिकता बदलायला हवी आणि भविष्याची तरतूदही व्हायला हवी.’

गोगटे काका स्वत:देखील व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळून आपल्या कुटुंबाला धरून आहेत. आठवड्यातून एक-दोनदा ते घरी जातात आणि पुन्हा सामाजिक जबाबदारी म्हणून आश्रमात रुजू होतात. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून यथाशक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिक मदत केली पाहिजे, असे ते म्हणतात. समाजकार्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही, तर याआधीही ते भाईंदरच्या सुबोध विद्यालयात आणि कार्नेशन इंग्लिश स्कुलचे संस्थापक सदस्य आणि सचिव होते. भाईंदर येथील ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष पद त्यांनी सांभाळले. संस्कृत, मराठी विषयाचे अध्यापन केले. दूरदर्शनच्या वृत्त विभागात भाषांतराचे, तसेच बातम्यांच्या संपादनाचेही काम त्यांनी 22 वर्षे पाहिले. या सर्व कार्यात त्यांच्या पत्नीची आणि मुलांची त्यांना बहुमोल साथ लाभली. परंतु पत्नीच्या निधनानंतर त्यांनीदेखील वानप्रस्थी जीवन स्वीकारले. वानप्रस्थी आश्रमाचा पूर्ण परिचय झाल्यावर त्यांनी आपणहून व्यवस्थापकाची जबाबदारी स्वीकारली आणि गेली तीन वर्षे ते समर्थपणे ती सांभाळत आहेत. या सगळ्या वाटचालीत प्रत्येक कर्मचाऱ्याने केलेले सहकार्य आणि विश्वस्त मंडळाने दाखवलेला विश्वास यामुळेच आपण हे काम सहजपणे करू शकलो, अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात.

वृद्धांसमवेत राहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी निमित्तमात्र झाल्याचे समाधान गोगटे काकांच्या चेहऱ्यावर झळकते. ‘सहलीसाठी आपण विविध ठिकाणांची निवड करतो. कधीतरी सहज वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बालिकाश्रम या ठिकाणीदेखील सपरिवार भेट द्यावी. त्यामुळे आपले समाजभान जागृत होईल. आपल्याला घेण्याची सवय असते, तशी देण्याचीही सवय लावता आली पाहिजे. पैसे, वस्तू, अन्न, धान्य या गोष्टी तर गरजेच्या आहेतच, परंतु माणसाने माणसाला माणुसकीची वागणूक देणे नितांत गरजेचे आहे’, असे सांगून अलार्म काकांच्या भूमिकेत असलेले गोगटे काका आश्रमाला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालतात.

संपर्क : वानप्रस्थ आश्रम, देव आळी, मु. पो. अनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे- 421302
मोबाईल क्रमांक : 9987115307/ 9975707785

आपली प्रतिक्रिया द्या