प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर शक्य

68

सामना प्रतिनिधी । पुणे

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पीओपीचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, हे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीओपीच्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.

सजावट किंवा विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण करण्यासाठी पीओपीचा वापर केला जातो; परंतु या पीओपीचा पुनर्वापर करता येत नसल्याने त्याचा कचरा मोठ्या प्रमाणावर होऊन त्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क विभागाने शोधून काढलेल्या प्रणालीनुसार पीओपी भाजणे, दळणे अशा सोप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्यास त्यातून पुन्हा पीओपीच्या कलाकृती किंवा अन्य मूर्ती बनविता येणे शक्य आहे, असे या प्रयोगाचे संचालक आणि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. जयंत गाडगीळ यांनी सांगितले. या प्रकल्पात त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के यावेळी उपस्थित होत्या.

विद्यापीठातील सायन्स पार्क विभागाकडून गेल्यावर्षी प्रयोगादाखल एक टन पीओपीवर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा ८०० किलो पीओपी मिळविण्यात यश आले आहे. गणपती विसर्जनाचे वेध लागले की, पीओपी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. या जटील समस्येवर विद्यापीठातील संशोधकांनी उत्तर शोधले आहे. पीओपीच्या भुकटीचा पुनर्वापर करता येत नाही, असा समज आजवर होता तो आता दूर झाला आहे.

पीओपीचा पुनर्वापर हा प्रकल्प केवळ प्रायोगिक पातळीवर न राहता तो समस्या सोडविण्यासाठी उपयोगात आणला गेला पाहिजे. गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेऊन पाठबळ द्यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. – डॉ. जयंत गाडगीळ

आपली प्रतिक्रिया द्या