भावाच्या खुनाचा बदला; दगडाने ठेचून तरुणाचा खून

भावाचा खून केल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत दगडाने ठेचून त्याचा खून केला. ही घटना रविवारी (13 रोजी) सकाळी आठच्या सुमारास थेरगाव येथील जगतापनगरमध्ये घडली.

साहील राहुल साबळे (वय 18, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहील याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरुण परदेशी (रा. काळेवाडी), यश भगवान रोकडे (रा. पिंपरी), अश्पाक दिलशाद शेख (रा. पिंपरी), प्रथमेश विष्णू हजारे (रा. पिंपरी), ओमकार कामत, लक्ष्मण कोळी, साहील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि त्यांचे साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील साबळे याने काही दिवसांपूर्वी गणेश ऊर्फ दादू शांताबाई रोकडे याचा खून केला होता.

त्याचा राग मनात धरून या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी कट रचून साहील साबळे याला जगतापनगर येथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

भांडणात डोक्यात फावडे मारून खून भांडण सुरू असताना वृद्धाच्या डोक्यात फावड्याने मारून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी (12 रोजी) रात्री नऊच्या सुमारास आळंदी-पुणे रोडवर काळेवाडी येथे घडली. पंडित श्रावण पाटील (वय 59, रा. चहोली बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील पंडित पाटील (वय 34) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुन पांडुरंग काळे (वय 78, रा. काळेवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अर्जुन काळे आणि फिर्यादी यांचे वडील पंडित पाटील यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या कारणावरून अर्जुन काळे याने फावड्याने पंडित पाटील यांच्या डोक्यात मारले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन पंडित पाटील यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक भामरे तपास करीत आहेत.