परीक्षण – संघर्ष जीवनाचं आत्मकथन

>> श्रीकांत आंब्रे

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचं ‘माध्यमाच्या पटावरून’ हे आत्मकथन म्हणजे त्यांनी जीवनात आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ केलेल्या असामान्य संघर्षाचं थक्क करणारं चित्रण आहे. एका स्त्राrच्या आयुष्यात इतकी संकटं, दु:खं, आव्हान आणि यातनांचे डोंगर कोसळल्यानंतरही ती त्यांच्याशी मन खंबीर करून झुंज देत यशाची शिखरं पार करते. खूप नावलौकिक मिळवून यशाचा पल्ला गाठते हे सारंच असामान्य आहे. कोणाच्याही वाटय़ाला येऊ नये असा भोगवटा तिच्या वाटय़ाला येऊनही त्यातून ती बाहेर पडली ती तिच्याकडे असलेल्या आत्मविश्वासामुळे आणि धीट स्वभावामुळे.

राहीचे वडील शंकरराव निकाळजे. ते सेंट जॉर्ज इस्पितळातील कर्मचारी. राहीचा जन्म त्याच इस्पितळातला. त्याच कम्पाऊंडमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या क्वार्टर्समध्ये तिचं बालपण गेलं. आई, वडील, बहीण आणि धाकटा भाऊ असं हे पाच जणांचं कुटुंब. राही पहिल्यापासून कुशाग्र बुद्धी असलेली, अभ्यासात प्राविण्य मिळवणारी आणि अंगी नको इतकी बेडर वृत्ती आणि धीटपणा असणारी. वडिलांची इस्पितळातील कामाबरोबरच चाललेली समाजसेवा आणि आजूबाजूचं जीवन याचे परिणाम तिच्या मनावर होत होते. त्यातून तिच्या मनाची जडणघडण होत होती. वडिलांनी चौथीनंतर तिला मराठवाडय़ातील बीड जिल्हय़ातील त्यांच्या आष्टी या गावी आई आणि बहिणीसह शिक्षणासाठी पाठवलं. गावात तिने अस्पृश्यता पाहिली होती. उच्चवर्णीयांकडून दलितांना मिळणारी अस्पृश्यतेची वागणूक तिच्या मनाला जशी बोचत होती तशीच दलित कुटुंबातील अनेक पुरुष घरातील पत्नीला दारू पिऊन अमानुष मारझोड करतात हे शल्यही बोचत होतं. तिचं लग्न हा तिच्या आयुष्यातील फार मोठा अपघात होता असे ती म्हणते. तिचा पती एक मनमौली तरुण होता. राहीला मूल हवं होतं. तिचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, परंतु तिचा संसार आणि मूल फार काळ टिकलं नाही. राहीवर झालेल्या या पहिल्या आघातानंतर तिला एकामागून एक हादरे बसत राहिले. दरम्यान, ‘लोकमत’ या दैनिकात तिला वार्ताहराची नोकरी मिळाली.

‘लोकमत’मध्ये तिने स्वत:ला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेतलं. मंत्रालय, तिथले अधिकारी, मंत्री यांच्या वारंवार भेटीतून राहीचा जनसंपर्क वाढत गेला. राजकीय बीट सांभाळताना त्यातील बारकावे, पेचप्रसंग जाणून आपली बौद्धिक क्षमता तिला पणाला लावावी लागली. 1988 मध्ये पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तिने कव्हर केलं. तिच्या या क्षेत्रातील अनुभवाच्या कक्षा रुंदावत गेल्या. ‘लोकमत’चे तत्कालीन संघटक बाबा दळवी यांचं सहकार्य, मार्गदर्शन उमेदवारीच्या काळात तिला उपयोगाचं ठरलं. शरद पवारांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांच्या मुलाखती तिने घेतल्या. नरसिंह राव, व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द, बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत झालेले बॉम्बस्फोटांचे सत्र, त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, त्यात अनेक निष्पापांचे गेलेले बळी या साऱयाचं वृत्तांकन तिने जीव धोक्यात घालून केलं. युतीची आलेली भगवी लाट, त्यानंतर झालेल्या निवडणुका, भाजप नेत्यांची एकमेकांना पाण्यात पाहण्याची वृत्ती, छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचं भूमिगत होणं आणि कोणत्याही पत्रकाराला, वार्ताहराला त्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही तेव्हा डोकं लढवून त्यांचा पत्ता शोधून काढून त्यांची भेट घेऊन त्यांनी एक शब्दही उच्चारला नसता केवळ हातवाऱ्यावरून त्यांच्या मनातील भाव ओळखत त्यांची मुलाखत छापणारी राही ही एकमेव पत्रकार होती.

बातमी कशी मिळवावी, नेत्यांच्या विचारांचे अंदाज कसे बांधावेत यासाठी जिवाची पर्वा न करता राहीने केलेली धडपड वाचली म्हणजे तिला पत्रकारितेच्या कामगिरीबद्दल मिळालेले अनेक सन्माननीय पुरस्कार तिच्या यशस्वी पत्रकारितेवर शिक्कामोर्तब करणारेच होते याची साक्ष पटते. मात्र आपले कर्तृत्व डावलून आपल्याला कधीही प्रमोशन, बढती न देता उलट आपल्या डोक्यावर बाहेरची ‘विद्वान’ बसवून आपली सतत कशी कोंडी, अपमान आणि अवहेलना करण्यात येत होती याचा सविस्तर पाढा तिने वाचला आहे. एखादा अपवाद वगळता इतर ठिकाणीही पोरसवदा संपादकांची तशीच हेकट वृत्ती, आपल्यावर होणारा अन्याय डोळय़ाने पाहणारे, पण खरेखोटे करण्याची वेळ आली की मूग गिळून गप्प बसणारे कातडीबचावू सहकारीही तिने पाहिले. ज्या काळात कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल यांसारखी साधने उपलब्ध नव्हती, त्या काळातील पत्रकारिता आणि तेही वार्ताहर म्हणून काम करणं हे सोपं काम नव्हतं. अशा काळात धावपळ करत वार्तांकन करणं, एक्सक्लुझिव्ह बातम्या मिळवणं ही कठीण गोष्ट होती. अशा काळात राहीने धाडसी पत्रकारिता केली.

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तिच्या पत्रकारितेतील कामगिरीबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. पत्रकारितेमुळे जगभरातल्या लोकशाहीला निर्लेपपणे बघता आणि अभ्यासता आलं यातच ती समाधान मानते. या पुस्तकात तिने प्रांजळपणे आपलं मन मोकळं केलं आहे. पुस्तकातील तिची सन्मानचिन्हं आणि पुरस्कार स्वीकारतानाची अनेक रंगीत छायाचित्रे पुस्तकाची लज्जत वाढवतात. तिच्या धाडसी पत्रकारितेला आणि तिने जीवनात केलेल्या संघर्षाला कोणीही सलाम केल्यावाचून राहणार नाही.

माध्यमाच्या पटावरून (आत्मकथन)
शब्दांकन : श्यामल गरुड
प्रकाशक : शब्द प्रकाशन
पृष्ठे : 224, मूल्य : 550/- रुपये