परीक्षण – उत्कंठावर्धक कथा

>> श्रीकांत आंब्रे

कथालेखनावर उत्तम पकड असणारे काशिनाथ माटल यांचा ‘खेळ मांडियेला नवा’ हा चौथा कथासंग्रहही त्यांच्या पूर्वीच्याच तीन कथासंग्रहाइतकाच वाचनीय, उत्कंठावर्धक आणि कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंधांचा पीळ विविधांगाने कायम ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथेत गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक व्यक्तिरेखांच्या भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्यांची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, नात्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱयांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं.

एकंदर आठ कथा या कथासंग्रहात आहेत. त्या सर्वच कौटुंबिक कथा असल्या तरी त्यातून प्रेम, द्वेष, कुटुंबवत्सलता, त्याग, सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेचे प्रस्थ, अंधश्रद्धा, उपेक्षितांचे जग, समाजातील विवंचनाग्रस्त घटना यातून सामान्य माणसाच्या व्यथांचे प्रत्ययकारी दर्शन घडतं. जणू अशी व्यक्तिमत्त्वं लेखकाच्या लेखणीतून व्यक्त होऊ पाहतात. त्यातून त्यांची कथा आकाराला येते. त्यांच्या अनेक कथांमधून काळाची पावले उमटताना दिसतात.

त्यांच्या ‘खेळ मांडियेला नवा’ या कथेत तरुण एस. टी. ड्रायव्हरच्या मनस्वी प्रेमप्रकरणाला एस.टी. कामगारांच्या बिकट जिण्याची आणि जातिव्यवस्थेच्या काटेरी मार्गाची किनार आहे. ‘विसावा’ या कथेत एका निवृत्त व्यक्तिमत्त्वाची व्यथा आहे. पत्नीचं आकस्मिक निधन झाल्यावर त्याला नाना-नानी पार्कच्या रूपाने लाभलेल्या विसाव्याला त्याच्यावर एका सुस्वभावी प्रौढ स्त्राrच्या प्रेमात पडल्याचा संशय त्याची एक घटस्फोटित मुलगी घेते आणि त्याचं जगणं असहय़ करून टाकते याची ही विदारक कहाणी आहे. ‘

अल्झायमर’ या व्याधीवर आधारित ‘किनारा’ ही कथा पालिकेच्या महाहॉस्पिटल वॉर्ड इन्चार्ज परिचारिकेला झालेल्या या आजारानंतर त्या हॉस्पिटलमधील तिच्या जवळच्या सहकाऱयांकडून तिचा होणारा दुस्वास आणि त्यातून स्वतःला सावरण्याचा तिचा स्वभाव यातून सामाजिक आणि कौटुंबिक, नात्याचे दुवे किती कच्चे असतात, हे प्रत्ययाला येतं. ‘या नात्याला नाव काय देऊ?’ या कथेत सुजित आणि आदिती यांच्या निस्सिम प्रेमांची आणि परदेशी राहून मोबाइलवरून तिच्याशी प्रेमाचं खोटं नाटक करणाऱया दुर्वेशच्या चालबाजीची ही कहाणी आहे. खऱया प्रेमाची आणि जातिव्यवस्थेमुळे खऱया प्रेमाची कुचंबणा कशी होते याचा प्रत्यय देते. ‘अतर्क्य’ ही कथा शीर्षकाप्रमाणेच एक ‘अतर्क्य’ घटना वाटेल अशी आहे. विक्रम गेणू वनारसे आणि त्याची पत्नी नक्षलवाद्यांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या वनारसेमुळे स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्या शाळेतील शिक्षक प्रा. सदावर्ते यांच्याकडे आपल्या हुशार मुलाचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून त्यांचा सल्ला घेण्यासाठी येतात. अनेक नक्षलवाद्यांना ठार मारून विक्रम वनारसे आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेतो. त्यात मरण पत्करतो, त्याची इन्स्पेक्टर पत्नीही नक्षलवादीविरोधी मोहिमेत मृत्यूला सामोरी जाते. पण पुढे त्यांच्या मुलाचं भवितव्य मार्गी लागतं का, ही उत्कंठा वाचकांना अस्वस्थ करून जाते. ‘तिची कहाणी’ या कथेत तृतीयपंथीयांच्या जगात राहून स्वतःचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणाऱया हुशार आणि तल्लख बुद्धीच्या अनुश्रीची कहाणी चकित करणारी आहे ‘जन्म’ ही कथा मूल होत नसल्यामुळे पती-पत्नीची, आश्रमातून घेतलेल्या दत्तक पुत्राची आणि त्यानंतर त्या जोडप्याला झालेल्या स्वतःच्या मुलाच्या सापत्नभावाचे दर्शन घडवणारी आहे.

‘चॅम्पियन’ या कथेत साताऱ्यातील दुर्गम भागात राहणाऱया आणि शालेय जीवनापासून मिल्खासिंग, पी.टी. उषासारखी धावपटू होऊन ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्स स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहणारी अभ्यासू आणि बुद्धिमान खेडवळ मुलगी संजना गरिबीत जीवन कंठून केवळ अशिक्षित आईच्या आणि मित्राच्या मार्गदर्शनामुळे आपलं स्वप्न सगळे अडथळे ओलांडून कसं पूर्ण करते हे खेडय़ातील मुलींना प्रेरणादायक आहे. ही कथा समाजापुढे एक नवा आदर्श ठेवते. काशिनाथ माटल यांच्या सर्वच कथा दर्जेदार आणि त्यांच्या प्रगल्भ जीवनसृष्टीची साक्ष देणाऱया आहेत. संतोष घोंगडे यांच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे कथासंग्रहाचे बाहय़रूपही देखणे झाले आहे.

खेळ मांडियेला नवा (कथासंग्रह)
लेखक: काशिनाथ माटल
प्रकाशक: संवेदना प्रकाशन, पुणे,
पृष्ठे : 160, मूल्य: 200 रुपये.