आम्ही दोघी- कोरड्या नात्यांमागच्या ओलाव्याचा शोध

>>रश्मी पाटकर, मुंबई

निसर्गाने प्रत्येक प्राण्याला भावना दिल्या आहेत. माणूस फक्त त्या भावनांमागचे अर्थ शोधू शकतो, जाणवून घेऊ शकतो. म्हणूनच माणसाची नाती ही जास्त गुंतागुंतीची असतात. या गुंतागुंतीमुळे जेव्हा त्याच्यासमोर नात्यांची आणीबाणी येते तेव्हा त्याच्या मेंदू आणि हृदयामध्ये तीव्र मतभेद होतात. अशावेळी माणसाची जडणघडण जशी झाली असेल तसे निर्णय घेतले जातात. ते चुकले तरीही निभावले जातात. पण, मानवी आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगाना नेहमी दोन पैलू असतात. निर्णय घेण्याच्या गडबडीत माणूस बऱ्याचदा प्रसंगांच्या दुसऱ्या पैलूला दुर्लक्षित करतो. पण, ती दुसरी बाजू असते, कायम.. निर्णय कोरडे वाटले तरीही त्यामागे कुठेतरी ओलावा दडलेला असतो. त्या ओलाव्याचा शोध म्हणजेच प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हा चित्रपट.

या चित्रपटाची कथा गौरी देशपांडे यांच्या ‘पाऊस आला मोठा’ या कथेवर बेतली आहे. मुळात गौरी देशपांडे या चाकोरीबाहेर लेखन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका. जगण्याकडे, त्यातल्या विसंगतीकडे तिरकसपणे बघण्याची एक अलौकिक दृष्टी गौरी देशपांडे यांना लाभली होती. त्यामुळे त्यांच्या कथेचा गाभा हा संपूर्णपणे वास्तव जीवनावर बेतलेला असतो. तो भाग या चित्रपटातही आहे. ही गोष्ट आहे सावित्री आणि अमला या दोघींची. चित्रपट सुरू होतो तेव्हा सावित्री उर्फ सावी ही जगदीश सरदेसाई या कोल्हापुरातल्या एका प्रसिद्ध वकिलाची मुलगी म्हणून आपल्या समोर येते. वडील अतिशय प्रक्टिकल विचारांचे, आई लहानपणीच गेलेली अशा वातावरणात सावी मोठी होते. सगळ्या गोष्टीला प्रॅक्टिकल फुटपट्टीवर मोजून पाहायची सवय लागलेली सावी वाढत्या वयासोबत हेकेखोर आणि कोरडी होत जाते. मुलीला आईची गरज नाही या हट्टापायी दुसरं लग्न न करणारे सावीचे वडील जेव्हा तिच्या ऐन दहावीच्या वर्षात दुसरं लग्न करतात तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. अमला उर्फ अम्मी ही तिची सावत्र आई सावीहून काही वर्षांनीच मोठी असते. त्यामुळे सावी सुरुवातीला तिला स्वीकारत नाही. पण, अडनिड्या वयातल्या सावीचे वडिलांशी वैचारिक मतभेद होतात आणि नकळत अम्मी आणि सावीत नातं जुळत जातं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अम्मी आणि सावीचं नातं खुलत जातं. दरम्यान, स्वतःच्या कोरडेपणामुळे सावीला आयुष्यात खूप सोसावंही लागतं. पण, आयुष्याच्या एका वळणावर सावी अम्मीमुळे कायमची बदलून जाते. नेमकं असं काय घडतं, ज्यामुळे सावीत हा बदल घडतो, ते मात्र चित्रपटातच पाहायला लागेल.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही नातं यात सरधोपट पद्धतीने मांडलेलं नाही. मग ते सावी आणि तिच्या वडिलांचं असेल किंवा अम्मी आणि सावीचं. त्या नात्याला वेगवेगळे पैलू आहेत आणि विशेष म्हणजे कोरड्या नात्यांमधूनही ते स्पष्टपणे समोर येतात. गौरी देशपांडेंसारख्या लेखिकेची कथा दाखवणं हेच एक मोठ शिवधनुष्य दिग्दर्शिकेने उचललं आहे आणि ते त्यांना मस्त जमलं आहे. रिडींग बिटवीन द लाईन्स असणारे प्रसंग वाचणं आणि पाहणं यात खूप फरक असतो. त्यासाठी ते प्रसंग तितक्याच कलात्मक दर्जाचे चित्रीत व्हावे लागतात. ही हातोटी प्रतिमा जोशींनी ज्या सहजरित्या साधली आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे त्यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे, यावर विश्वास बसत नाही. गौरी देशपांडे या द्रष्ट्या लेखिका होत्या. त्यांच्या कथेवर पटकथा लिहीणं हीसुद्धा तितकीच कठीण बाब. पण, प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी पटकथेवर भरपूर काम केल्याचं चित्रपट पाहताना जाणवतं.

तीच गोष्ट कलाकारांची. यातील कलाकारांची निवड अत्यंत चपखल आहे. सावीचा कोरडेपणा, तिचं प्रत्येक नात्याला प्रॅक्टिकल पातळीवरून पाहणं, तिची हेकेखोर वृत्ती, उन्मळून पडणं आणि भावनेचा ओलावा मिळाल्यानंतरचं बदलणं हे प्रिया बापट हिने उत्कृष्टरित्या दाखवलं आहे. मुक्ता बर्वे हिचा अभिनय पाहणं हा प्रेक्षकांसाठी एक सुखावणारा अनुभव असतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा या चित्रपटातून येतो. अम्मीचं कुतुहल, परिस्थितीने आलेलं शहाणपण, वाढत्या वयासोबत होणारा बदल तिने ज्याप्रकारे दाखवलाय, तो खरंच काबिल ए तारीफ आहे. किरण करमरकर, आरती वडगबाळकर, भूषण प्रधान, प्रसाद बर्वे या इतर कलाकारांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. या चित्रपटात एकच गाणं आहे आणि ते या चित्रपटाला अतिशय समर्पक आहे.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला बरेचदा कोरडेपणाने निर्णय घ्यावे लागतात. पण, मूळ मानवी स्वभावानुसार त्यातली भावनांची भूक ही कायम राहते. कारण तो ओलावा नेहमीच माणसाला हवाहवासा असतो. तो नसेल तर माणसाचं यंत्र होऊ शकतं, याची जाणीव आम्ही दोघी हा चित्रपट करून देतो. तसंच मैत्री या भावनेला वय, लिंग, आर्थिक, सामाजिक स्थिती किंवा कोणतीही भौतिक बंधनं नसतात हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो.