बत्ती गुल मीटर चालू : सामाजिक बत्तीचं फिल्मी मीटर

36

 >>  वैष्णवी कानविंदे-पिंगे 

सर्वसामान्यांना भेडसावणारा सामाजिक विषय आणि त्या विषयाला धरून पब्लिकला हमखास चेतावील असं नाट्य. त्याच्या जोडीला प्रेम, तरुणाई असं सगळं असलं की, सिनेमा चटकदार होतोच आणि असे चटकदार चवीचे सिनेमे प्रेक्षकांना आवडतातच. म्हणूनच अक्षय कुमार, अजय देवगण, नाही म्हणायला सलमान खान इत्यादी सिनेमातली बडी मंडळी सिनेमाचे सगळे फॉर्म्युले वापरून झाल्यावर या फॉर्म्युल्यावर बर्‍यापैकी स्थिरावलेलीदेखील दिसली आहेत आणि आता यात वर्णी लागलीय शाहीद कपूरची. तर प्रेक्षकांच्या काळजाला बर्‍यापैकी हात घालणार्‍या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमातून शाहीद कपूरचं मीटर सुरू झालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही.

‘बत्ती गुल, मीटर चालू’हे शीर्षकच बर्‍यापैकी स्पष्ट आहे. त्यामुळे सिनेमात साधारण काय असेल याचा अंदाज येतोच, पण तरीही थोडक्यात कथानक ते असं… उत्तराखंडातल्या एका गावात राहणारे तीन घट्ट मित्र. शाहीद कपूर, श्रद्धा कपूर आणि दिव्येंदू शर्मा. तिघांचेही स्वभाव एकमेकांपेक्षा अगदी वेगळे, पण तिघांचीही एकमेकांसाठी जीवदेखील द्यायची तयारी असते. त्यातला एक मित्र बिझनेस सुरू करतो. तो चांगला सुरू असतो, पण अचानक येणार्‍या विजेच्या प्रचंड बिलांमुळे तो हतबल होतो. त्यावर त्याला विजेच्या कंपनीतूनही टोलवाटोलवी मिळते आणि बिझनेस बंद पडायला येतो. अशातच ज्या मैत्रीचा एकमेकांना आधार असतो त्या मैत्रीतही काही कारणांमुळे फूट पडते आणि तो संपूर्णपणे नैराश्याने घेरला जातो… आणि तो आत्महत्या करायचा निर्णय घेतो. मग नक्की काय होतं? त्यांची मैत्री कायमची तुटते का? वीजेचं संकट सुटतं का? वीजचोरी, चुकीच्या मीटरमुळे उभ्या राहणार्‍या समस्या या गोष्टींचं पुढे काय होतं… अशा गुंत्याला सोडवत ही कथा उलगडते.

हा सिनेमा रंगतदार आहे हे नक्कीच. शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघांचाही वावर चमकदार आणि स्टायलिश आहे. पडद्यावरचे हिरोहिरॉईन म्हणून दोघेही पूरक आहेत, तर दिव्येंदू शर्मादेखील या सिनेमात लक्षात राहतो. त्याने रंगवलेला बॉय नेक्स्ट डोअर, गुणी, सभ्य, सुशील मुलगा कोणालाही आवडावा असाच उभा राहिलाय आणि त्याने पहिल्या अर्ध्या भागात कामही चांगलं केलंय. दुसर्‍या भागात त्याच्या वाट्याला विशेष काम नाही, पण एकूणच तरुण, रंगतदार फळी चांगली जमून आली आहे. सिनेमाची मूळ संकल्पना चांगली आहे. म्हणजे असंख्य गावांमध्ये असणारी विजेची समस्या आणि या समस्येतनं वीज कंपन्यांची भाजली जाणारी पोळी, विजेचा प्रश्न किती अपरिहार्य आहे ते हा सिनेमा पाहताना कुठेतरी जाणवतं खरं आणि त्या प्रश्नासाठीचा लढा बघताना भारावायला पण होतं, पण तरीही हा लढा पटकथेतून तितका खुलला नाही.

दिग्दर्शकाकडे आधी टॉयलेट एक प्रेमकथाचा सामाजिक सिनेमानुभव आहे आणि त्याचाच प्रभाव या सिनेमावर दिसतो. एका मुद्द्यापर्यंत हा प्रश्न उभा रहात असताना त्यात त्या प्रश्नाची खोली दिसण्यापेक्षा सिनेमाची रंजक नाट्यमयताच जास्त आढळून येते. जरी हे नाट्य महत्त्वाचं असलं तरी खरा प्रश्न मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. जॉली एलएलबी दोनमध्ये जे कोर्टरूम नाट्य उभं राहिलं होतं, त्यात जशी सखोलता आणि रंजकता याचं मस्त मीलन होतं तसं यात अपेक्षित होतं. त्या नाट्याचा प्रचंड प्रभाव असूनही हे नाट्य तितकं रंगत नाही. तसंच सिनेमा जिथे सुरू होतो तिथे व्यक्तिरेखा मांडण्यामध्येच बराच वेळ गेलाय. त्यातले किस्से किंवा शाहीद कपूरची लबाड वकिली सादर करतानाची दृश्यं प्रभावी नाहीत. भाषेमुळे असेल किंवा एकूण दृष्यांच्या प्रभावामुळे, पण पहिली पंधरा मिनिटं कंटाळवाणीच होतात. नंतर मात्र सिनेमा पकड घेतो, पण त्या पहिल्या पंधरा मिनिटांमुळे सिनेमात जे नंतर खेळता आलं असतं त्याला मर्यादा आल्या आहेत. असो.

पण उत्तरखंडाचं विहंगम दृष्यं, तिथले कानेकोपरे, माणसं, त्यांची जीवनशैली हे सगळं पाहताना कसं टवटवीत वाटतं. त्यात श्रद्धा कपूर आणि शाहीद कपूरचा सहज वावरदेखील एकूण वातावरण रंगतदार करतो. गाणी छान आहेत आणि बाकीचे कलाकारही बरे आहेत, पण अनेक कलाकार उगाच वापरल्यासारखे वाटतात. अर्थात अध्येमध्ये वापरलेली विडंबनात्मक शैली आणि काही संवाद सिनेमाला उजळवतात. पण या सिनेमाची कारण नसताना वाढलेली लांबी, त्याचं अति मसालेदारकरण यामुळे ते उजळलेले क्षण थोडे झाकोळलेही जातात. तर थोडक्यात असं, हा सिनेमा करमणूकप्रधान तर आहे, पण सामाजिक सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहताना त्यातला त्यातल्या विषयापेक्षा फिल्मीपणा जरा जास्तच जाणवतो इतकंच.

सिनेमा         :   बत्ती गुल, मीटर चालू

निर्माता        :    भूषण कुमार, किशन कुमार, नितीन चंद्रचूड,

                     श्री नारायण सिंग, निशांत पाटील

दिग्दर्शक       :   श्री नारायण सिंग

लेखक           :  सिद्धार्थ सिंग, गरिमा वहाळ

छायांकन      :    अंशुमन महाले

संगीत          :    अनू मलिक, रोचक कोहली, साचेत -परंपरा

कलाकार       :    शाहीद कपूर, श्रद्धा कपूर, दिव्यंदू शर्मा,

                      यामी गौतम, समीर सोनी, सुधीर पांडय़े

आपली प्रतिक्रिया द्या