ब्लॅक विनोदी सुसाट मेल

31

>> वैष्णवी कानविंदे – पिंगे

सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसाचं आयुष्य चाकोरीला घट्ट बांधलेलं असतं. त्याचं घर, नातं, नोकरी, जेवण, दिनचर्या, कर्ज, हफ्ते या सगळय़ात कमालीचा तोचतोचपणा आलेला असतो, पण तरीही तेच सगळं तो दररोज नित्यनेमाने खेचत असतो. आपल्या आजूबाजूला दिसणारे हजारो लाखो लोक हे असेच बिनचेहऱयाचे मध्यमवर्गीय असतात. हेच आयुष्य जगत असतात, पण जर एक दिवस एखाद्याने आनंद शोधण्यासाठी रोजची चाकोरी जरा बदलुया म्हणून काहीतरी प्रयत्न करायचा ठरवला आणि भलतंच काहीतरी हाती लागलं तर…? बरं ते जे भलतंच हाती लागलंय ते बदलण्याच्या ईर्षेने त्याने आपल्या सगळय़ा मध्यमवर्गीय मनाच्या चौकटी मोडून काहीतरी गुन्हा करायचा ठरवला तर काय होईल? अशाच एका चाकोरीतलं कंटाळवाणं आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्या वादळाला सामोरं जाताना त्याने मोडलेली नेहमीची चौकट याची गंमतीदार गोष्ट म्हणजे ब्लॅकमेल हा सिनेमा.

नेहमी प्रदर्शित होणाऱ्या कुठच्याही सिनेमापेक्षा वेगळा आहे. मुळात तो अभिनय देव या दिग्दर्शकाच्या मुशीतला सिनेमा आहे. अभिनय देवचा ‘देल्ली बेल्ली’ आवडला असेल तर या सिनेमाच्या मांडणीचा अंदाज मांडता येईल. (म्हणजे फक्त धाटणी, वेग… बाकी काही साम्य नाही.) ब्लॅक कॉमेडी या पातळीत मोडणारा हा सिनेमा पाहताना घडणाऱ्या साखळीत आपण कधी गुंतत जातो ते कळतही नाही. ब्लॅक कॉमेडी अर्थात दुःखातून विनोदाची निर्मिती आणि या सिनेमाने ही नस अगदी अचूक पकडली आहे.
तर ही गोष्ट टॉयलेट पेपर विकणाऱ्या एका सेल्समनची आहे. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगणाऱ्या या सेल्समनच्या आयुष्याला काही घटनांमुळे अचानक वेगळं वळण लागतं आणि अचानक आयुष्याला वेग येतो. त्यातून जी धमाल उडते ती म्हणजे हा सिनेमा.

बारकावे आणि साध्यातल्या साध्या घटनांचा अचूक वापर करत नेमक्या जागा अचूक शोधून काढल्या आहेत त्यामुळे खरी मजा येते. लेखन हा या सिनेमाचा कणाच म्हणायला हवा. उत्तम बांधलेली पटकथा आणि त्यावर चढलेला संवादांचा अचूक साज याचं चांगलं उदाहरण म्हणजे हा सिनेमा म्हणावा लागेल. या सिनेमाचं संगीत तसं लक्षात राहणारं नाही, पण त्या त्या प्रसंगांना त्या त्या क्षणी मात्र ते चपखल बसलं आहे. आयटम नंबर सादर करायला उर्मिला मातोंडकर आहे यातच वेगळेपण दिसतं नाही का.

अभिनयाच्या बाबतीत तर विचारायला नको. चांगल्या सिनेमाच्या कोंदणात जर चांगले कलाकार असतील तर सिनेमा चमकतोच. तसंच काहीसं या सिनेमाच्या बाबतीत झालंय. इरफान खान, कीर्ती कुल्हारी, ओमी वेद्यसारखे कलाकार असल्याने हा सिनेमा आणखीच बहार आणतो. इरफान खानने आपल्या नेहमीच्या शैलीत या सिनेमाच्या मुशीला अधिक सतेज बनवलंय यात शंकाच नाही.

सिनेमा मध्यंतराच्या आधी बैठक तयार करत असल्याने थोडा वेग मंद आहे की काय असं वाटत राहतं, पण मध्यंतरानंतर मात्र अविरत मजा यायला लागते. असे सिनेमे नक्कीच वेगळेपणाचा आनंद देतात आणि त्याच त्याच पद्धतीत अडकलेल्या प्रेक्षक विचारशैलीला नवं खाद्य देतात. त्यामुळे वेगळेपणाची आवड असेल तर ब्लॅकमेल नक्कीच तुमच्याकरिता मेजवानी आहे. अभिनयाच्या खास प्रयत्नाकरिता आणि इरफानच्या अभिनयाकरिता हा सिनेमा पाहायलाच हवा.

 •  दर्जा : साडे तीन स्टार
 •  सिनेमा : ब्लॅकमेल
 • निर्माता : अभिनय देव,
  भूषण कुमार,
  किशन कुमार दुआ
 •  दिग्दर्शक : अभिनय देव
 •  लेखक : परवेझ शेख, प्रद्युम्न सिंग
 •  छायांकन : जय ओझा
 •  संगीत : मिकी मॅकक्लॅरी
 •  कलाकार : इरफान खान,
  कीर्ती कुल्हारी, दिव्या दत्ता, अरुणोदय सिंग,
  अनुजा साठे गोखले,
  ओमी वैद्य,
  उर्मिला मातोंडकर
आपली प्रतिक्रिया द्या