पचनसंस्थेला जपा!

>> डॉ. किशोर अतनूरकर

पापी पेट का सवाल है, कशासाठी? पोटासाठी, मी अमूक केलं तर तुझ्या पोटात का दुखतंय? साहेब, बाकी काहीपण करा, पण पोटावर पाय देऊ नका… पोटाबद्दल अशा अनेक वाक्प्रचाराचा वापर आपण आपल्या रोजच्या संभाषणात करत असतो. असं बोलणं का प्रचलित झालं? कारण भूक लागल्यानंतर जेवायला मिळण्याचा आणि आपल्या अस्तित्वाचा डायरेक्ट संबंध आहे. पोटाची भूक मिटवण्यासाठी माणसाला पैसे कमवावे लागतात. ती मिटली तरच बाकीच्या गोष्टी, अन्यथा सब झूठ. जिवंत राहण्यासाठी शरीराचा हा कारखाना चालवण्यासाठी, पोटात अन्न घालणं, जेवण करणं हा आपल्या सर्वांचा जीवनावश्यक भाग आहे. जगात काही लोक असे आहेत की, ज्यांना दोन वेळचं जेवणदेखील नीट मिळत नाही. त्यांना जे काही मिळेल, जेव्हा मिळेल ते खावं लागतं. पण ज्यांना अशी भ्रांत नाही ते लोकदेखील काय खावं आणि काय खाऊ नये याबाबतीत वर्षानुवर्षे चुका करतात आणि पोटाच्या विकाराला बळी पडतात. बऱयाचदा त्यांच्या या चुका अज्ञानापोटी किंवा गैरसमजुतीतून होतात. काही वेळेस समजून उमजून, पण बेफिकीर वृत्तीमुळे होतात. काही लोक जेवताना जिभेवर कितीही प्रयत्न केला तरी ताबा ठेवू शकत नाहीत. कारण काही जरी असलं तरी या अशा सवयीमुळे पोटाचा आणि पर्यायाने शरीराचा निकाल लागल्याशिवाय राहात नाही.

पोटाच्या विकारांची यादी ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्येपासून सुरू होऊन पचनसंस्थेशी संबंधित कोणत्याही अवयवाच्या कॅन्सरपाशी थांबते. या पोटाच्या आजारांची आपली नीट ओळख व्हावी, त्या आजाराच्या संबंधात कोणत्या तपासण्या केल्या जातात, उपाय काय, कोणता आजार झाल्यावर काय खावं आणि काय खाऊ नये याची माहिती व्हावी याबाबतीत एखाद्या पुस्तकाची गरज होतीच. नांदेडचे पोटाच्या विकारांचे तज्ञ डॉ. नितीन जोशी यांच्या ‘आपलं पोट आपल्या हातात’ या पुस्तकाने ती गरज भागत आहे. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास हा आता प्रत्येक स्पेशालिटीमध्ये झाला आहे. तसा तो gastroenterologyed या विषयात पण झाला आहे. पचनसंस्थेची दुर्बिणीव्दारे तपासणी आणि ती करत असतानाच आवश्यकता भासल्यास लगेच शस्त्रक्रिया या तंत्रज्ञानाने तर क्रांती घडवली आहे. पोटाच्या आजाराशी संबंधित निदान आणि उपचार करताना जे बदल झाले आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत समजेल अशा भाषेत पोचवण्याचे काम हे पुस्तक करते. या पुस्तकातली सगळे धडे महत्त्वाचे आहेत. अपचन, ऍसिडिटी, लठ्ठपणा या विषयाबद्दलची माहिती तर पुनः पुन्हा वाचून लक्षात ठेवण्याजोगी आहे. अस्वस्थ मनाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊन इर्रिटेबल बॉवेल सिन्ड्रोमच्या दुष्टचक्रात माणूस कसा अडकतो याचं डॉ. नितीन जोशीने केलेले विवेचन समजून घेण्यासारखे आहे. मला विशेष आवडलेला चॅप्टर हा काविळाशी संबंधित आहे. हे चॅप्टर वाचल्यानंतर पिवळय़ा कावीळबद्दलचे सर्व गैरसमज दूर होण्यास मदत होते.

पुस्तकाचं मुखपृष्ठ नयन बाराहातेंनी अर्थपूर्ण असं केलं आहे, मुखपृष्ठावर पचनसंस्था म्हणजे एक गिरणी किंवा कारखाना असं समजतं. ती गिरणी न बिघडता अनेक वर्षे चालू राहावी असं वाटत असेल तर त्यासाठीचं इंधनरूपी अन्न तोंडात टाकताना समजदारी दाखवावी लागेल. अन्यथा आपलं पोट आपल्या हातात राहणार नाही.

मेंदू, हृदय आणि फुफ्फुसाच्या तुलनेत पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित अवयवांना दुय्यम दर्जा दिला जातो. नितीन जोशी यांचं हे पुस्तक वाचल्यानंतर मेंदू, हृदयासारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवाचे कार्य व्यवस्थित अव्याहतपणे चालू ठेवण्याचा मार्ग पोटातूनच जातो असं म्हणायला हरकत नाही. आपल्या पचनसंस्थेला जपल्यास अनेक पोटाचे विकार आपल्याला होणार नाहीत असा संदेश नितीन जोशींनी आपल्या पुस्तकातून दिला आहे.

डॉ. नितीन जोशी यांचं प्रशिक्षण ग्रेट डॉ. नागेश्वर रेड्डी आणि पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी त्यांची कार्यपध्दती आणि विचार आत्मसात केले आहेत. या पुस्तकाचा उपयोग सर्वसामान्यांनाच होणार असं नसुन विशेषतः जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी होईल यात शंका नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरपर्यंत या पुस्तकाची एक प्रत विनामूल्य पोचविण्याचा मानस नितीन जोशी यांनी बोलून दाखवला. या पुस्तकाच्या दहा हजार प्रती आज वाचकांपर्यंत पोहोचल्या असून, मराठवाडय़ातील एखाद्या पुस्तकाच्या एवढय़ा मोठय़ा प्रती वाचकांपर्यंत पोहोचाव्यात हा एक विक्रमच आहे. या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.

आपलं पोट आपल्या हातात
पचनसंस्थेचे आजार – ओळख, उपाय आणि उपचार
लेखक – डॉ. नितीन जोशी
प्रकाशक – प्रज्ञा प्रकाशन
किंमत – २२० रुपये.