कसदार सिद्धहस्त लेखणी

71

>> डॉ. विजया वाड

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी. अखंड… अव्याहत दर्जेदार लिखाण हे मतकरींचे वैशिष्टय़.

रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांनी तीन पिढय़ांना वेड लावले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बरे, या पिढय़ा आताच्या 20-20 च्या जमान्यातील नाहीत. बारा वर्षांची एक पिढी अशा.

लेखणीला गूढतेची ओढ, मनास बालकांच्या विश्वाचे आकर्षण नि लेखनाचे, लेखणीचे, अनाकलनीय पण जबरे सामर्थ्य. लोहचुंबक जसे लोखंडाचा आजूबाजूस पडलेला कीस अंगाला लगटून घेतो ना तोच प्रकार. मतकरी आपल्या लेखन सामर्थ्याने वाचकांना असंच आपल्या जवळ करतात. ‘बाळ, अंधार पडला’ हे श्रीकल्प प्रकाशनाने प्रकाशित केलेले रत्नाकर मतकरी यांचे गुढकथांचे पुस्तक आहे.

बालकांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यांच्या मनोव्यापाराचे शब्दचित्रण, भावभावनांची उकल रत्नाकर मतकरींनी अचूक शब्दांत प्रत्येक कथेत व्यक्त केली आहे.

‘बाळ, अंधार पडला’ ही पुस्तकाचे शीर्षक असलेली कथा कुठलेच नाते नसलेल्या माय लेकरांची हुरहूर लावणारी कथा हळव्या मनाच्या वाचकांच्या डोळय़ांत पाणी आणल्याखेरीज राहणार नाही. एक छोटा मुलगा जबरीनं भिकेला लावलेला नि एक अंतसमय अगदी जवळ आलेली मरणासन्न बाई. दोघांचे नाते काय? तर भीक जरा अधिक मिळावी म्हणून पोराचे तिजपाशी ‘दादा’ने बसविले जाणे. येणाऱया जाणाऱयाला वाटावे ही बिचारी आता मरणाच्या दारातली बाय. या गरीबडय़ाची माय. चार चवल्या बाळासमोर अधिक पडतात. दादा सुरू! ती मरण कुशीत घेऊन पडलेली बाई नि हे छोटेसे मूल यांच्यात संवादाविना तयार झालेला अनुबंध मतकरींनी इतका सुरेख चितारला आहे. बाई रोगग्रस्त आहे. ही माय मुलास तेवढीच देणगी देते गालावर एक लाल चट्टा. मरतानाची भेट. चला, निदान भीक मिळालीच पाहिजे म्हणून दादा आता तरी हातपाय तोडणार नाही त्या चिमुकल्या पोराचे. कथा संपते तेव्हा वाचकाच्या मनावर लाल चट्टा उठतो.

रत्नाकर मतकरी यांच्या कथांमध्ये दृश्यमाध्यमाची जबरदस्त ताकद आहे. लेखकाची ‘खेकडा’ ही फार गाजलेली कथा प्रस्तुत कथासंग्रहात समाविष्ट झाली आहे. ‘खेकडा’ या कथेने एक काळ गाजवला आहे. मनोव्यापारावर, मायेवर, प्रेमावर, उतलं मातलं शरीर इतकी मात करतं? वाचून मन सुन्न होतं. नव्या पिढीच्या, उमलत्या तरुण-तरुणींनी ही कथा नव्याने वाचायला हवी. एका अपंग, अत्यंत अशक्त मुलीवर प्रेम करणारा मुलगा. दोघंही बालकेच, पण ते निरागस प्रेम मनास भावत असतानाच वासनेपोटी आंधळा झालेला बाप, अन् मुलीचा अंत, पण शेवट अगदी अनपेक्षित कलाटणी देणारा नि कथेला वरच्या पातळीवर नेऊन ठेवणारा. ‘खेकडा’ ही कथा मानवी मनाची घट्ट पकड घेत संपते. तेव्हा क्रूरतेला मिळालेले उत्तर पाहून, वाचून वाचक समाधान पावतो.
यातली ‘निमाची निमा’ ही कथाही तरुण वाचकांना खूप आवडावी अशीच आहे. निमा ही छोटी मुलगी. या छोटय़ा मुलीची अत्यंत लाडकी बाहुली. तिचं नावही या चिमुकलीनं निमाच ठेवलंय लाडानं. आईच्या पश्चात निमाचे बाबा तिला दूरच्या बहिणीकडे म्हणजे निमाच्या आत्याकडे ठेवतात. ‘मलाही कुणी नाही राहील हो माझ्यात. मी प्रेमाने सांभाळीन’ असे आश्वासन बहीण भावास देते. निमाचा बाबा निश्चिंत नोकरीच्या गावी जातो. निमा आपल्या आत्याकडे जाताना तिची लाडकी बाहुली निमा घेऊन जाते. पण मग? बाहुलीला ती चटके का देते? कथा मुळातूनच वाच रसिका. अंगावर शहारे येईल. मानवी मनाचे काही अज्ञात कंगोरे एवढे विद्रुप असतात? असणार! नाहीतर अमानुष क्रौर्य कसे जन्माला आले असते?

मतकरींची तीन लेखन वैशिष्टय़े त्यांच्या कथांतून प्रकट होतात. एकतर सारी लेखनशैली नाटय़मय आहे. त्यांना दृश्य परिणामांचे अवधान आहे आणि तिसरे लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथांमध्ये आहे. मंदा पाटणकर ही त्यांची कथा या संग्रहात नाही, कारण या संग्रहातील कथांचे सारे नायक बाल आहेत. पण मी आवर्जून वाचकांना सांगीन मंदा पाटणकर वाचल्याखेरीज राहू नका.

मतकरींच्या गूढ कथा कधी वासनेची विकृती प्रकट करतात तर कधी अतर्क्य अशा मनोव्यापाराचे दर्शन घडवितात. खूप वेळा माणसे माणूसपण सोडून वैयक्तिक स्वार्थासाठी किती अमानवी वर्तन करतात ते वाचून मन हादरून जाते. काही अशुभ शक्तींचे दर्शन कथांमधून घडते. पण साऱया कथा या संग्रहात, बालकांच्या मानसिकतेचे दर्शनच घडवितात. स्वाभाविक निरागसता आणि अस्वाभाविक क्रूरता दाखवितात. कथेची वीण मजबूत आहे. अगदी प्रत्येक कथा पूर्ण वाचल्याशिवाय वाचकास चैन पडणार नाही. वासकरांनी एक सुंदर भेट ‘श्रीकल्प’तर्फे वाचकांना दिली आहे. मतकरींच्या बहुल लेखनात ती चमचमत्या सिताऱयाप्रमाणे चमकणारी साहित्यकृती म्हणून झळकत राहील.

बाळ, अंधार पडला
लेखक – रत्नाकर मतकरी
प्रकाशक – श्रीकल्प प्रकाशन
पृष्ठs – 225. किंमत – 200 रु.
प्रथमावृत्ती ः 2003.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या