महान राष्ट्रनिर्मात्याचे पुनर्स्मरण

56

>>मल्हार कृष्ण गोखले

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातली कथा. ग्रीसचा राजा ऍलेक्झांडर हा जग जिंकण्याची वल्गना करून युरोपातून बाहेर पडला. आज ज्या प्रदेशाला मध्यपूर्व असे म्हणतात, तो आशिया खंडाचा संपूर्ण भाग पादाक्रांत करून आणि इराण किंवा त्यावेळच्या पर्शियाच्या साम्राज्याचा चक्काचूर करीत तो हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन थडकला.

परचक्र हिंदुस्थानच्या दाराशी, उंबरठय़ाशी आलेले पाहून कमालीचा अस्वस्थ झालेला तक्षशीला या अत्यंत प्रख्यात विद्यापीठातला एक शिक्षक, एक आचार्य मगध सम्राट महापद्मनंद याच्याकडे गेला. त्याला आढळून आले की, महापद्मनंद राजकीय आणि सैनिकीदृष्टय़ा बलाढय़ आहेच, पण तो संपत्तीचा इतका लोभी आहे की, त्याचेच नागरिक त्याला धनानंद म्हणतात. धनानंदाला राष्ट्राबिष्ट्राची काही पडलेली नाही. संपत्ती, सत्ता, सुरा आणि सुंदरी यांच्या उपभोगात बुडालेल्या धनानंदाला अमर्याद सत्तेचा अमर्याद माज चढलेला आहे.

आचार्यांनी चंद्रगुप्त नावाच्या अनाम, अज्ञात मुलाला हाताशी धरून प्रथम राज्यक्रांती घडवली. धनानंदाचा उच्छेद करून प्रजापालक, उपभोगशून्य स्वामी अशा चंद्रगुप्ताला राज्यावर बसवले, पण आचार्यांचे मुख्य ध्येय होते बलवान अशा राष्ट्रनिर्माणाचे. आतून आणि बाहेरून असे बलाढय़ राष्ट्र की, ज्याच्याकडे वाकडा डोळा करून नुसते पाहण्याचीही कुणा परकीयाची हिंमत न व्हावी.

त्यासाठी आचार्यांना हवी होती धनानंदाचीच विश्वासू माणसे – सेनापती भागुरायण आणि अमात्य राक्षस. ही माणसे धनानंदासारखी सत्तेचा माज चढलेली नव्हती तर अत्यंत हुशार, कर्तबगार आणि राष्ट्राबद्दल पक्क्या निष्ठेची अशी होती. आचार्यांनी आपली सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून त्यांच्यावर मात केली, त्यांना वश केले आणि अखेरीस राष्ट्राच्या सेवेत जोडून घेतले. गांधारापासून नर्मदेपर्यंत एक अत्यंत बलाढय़ आणि नीतिमान असे राज्य उभे करून त्याला ‘चहूँ ओर से सुरक्षित’ बनवून आचार्य तक्षशीलेला निघून गेले. सगळे राजोपभोग नाकारून. कारण चंद्रगुप्तासारखी माणसे सतत घडवत राहणे हेच त्यांचे देवदत्त कार्य होते.

‘चाणक्य’ ही दूरदर्शन मालिका आली, गाजली. त्याला आता किमान वीस वर्षे उलटून गेली आहेत. आचार्यांचे जीवनध्येय आणि त्याकरिता त्यांनी लढवलेले राजकारण हे इतके अप्रतिम आहे की, हिंदुस्थानच्या जनतेला, भावी पिढीला त्यांची कथा पुनः पुन्हा सांगण्याची गरज आहे. आतापर्यंत हरी नारायण आपटे, डॉ. वसंत पटवर्धन, आनंद साधले, जनार्दन ओक, बाळशास्त्री हरदास यांनी आर्य चाणक्यांवर ग्रंथरचना केली आहे. पंडित र. पं. कंगले आणि ब. रा. हिवरगावकर (मधू दंडवते यांचे वडील) यांनी ‘कौटिल्य अर्थशास्त्र’ या अप्रतिम ग्रंथाचा अनुवाद केला आहे. चाणक्य आणि अमात्य राक्षस यांची राजकीय झटापट चितारणारे, विशाखदत्त या प्राचीन नाटककाराचे ‘मुद्राराक्षस’ हे नाटक तर विख्यातच आहे.

प्रस्तुत ‘चाणाक्ष’ या कादंबरीतून लेखक लक्ष्मीकांत ऊर्फ बाबू गंजेवार यांनी पुन्हा एकदा आचार्य चाणक्यांची ही स्फूर्तिदायी कथा वाचकांसमोर मांडली आहे. लेखक मराठवाडय़ातील कंधार या इतिहासप्रसिद्ध गावाचे रहिवासी असून उत्कृष्ट स्तंभलेखक आणि उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. प्रस्तुत कादंबरीत चाणक्य, चंद्रगुप्त, धनानंद, भागुरायण, अमात्य राक्षस, क्षपणक म्हणजे जैन मुनी बनलेला आचार्यांचा भेदनीती निपुण मित्र इंदुशर्मा अशा व्यक्तिरेखांच्या निवेदनातून कादंबरीचे कथानक उलगडत जाते. कथा प्राचीन काळाची असल्यामुळे भाषा भारदस्त अशा शैलीची मागणी करणारी आहे. लेखकाने तशी भाषा सफाईने वापरली आहे. संस्कृतप्रचूर असूनही बोजड न होता ओघवत्या शैलीत कथानक वेगाने पुढे सरकते आणि वाचक उत्कंठेने पुढे पुढे वाचत जातो. मात्र बोलीभाषेत आपण कधीही ‘व’ हे अक्षर वापरत नाही. असो, पुढच्या आवृत्तीत हा दोष सुधारला जावा.
संतुक गुलेगावकर यांचे मुखपृष्ठ व रेखाचित्रे, स्नेहल प्रकाशनाची एकंदर निर्मिती सुबक.

चाणाक्ष
लेखक – बाबू गंजेवार
प्रकाशक – स्नेहल प्रकाशन
पृष्ठ – 312, मूल्य – 350 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या