नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीचा वेध

>> श्रीकांत आंब्रे

चौकट वाटोळी’ या अविनाश कोल्हे यांच्या या कादंबरीच्या शीर्षकातूनच तिचं वेगळेपण लक्षात येतं. कादंबरीचं थोडक्यात कथानक असं. पुण्यातील एका मध्यमवर्गीय नोकरदार गृहिणीच्या जीवनात अचानक योगायोगाने एक अनोळखी परपुरुष येतो आणि तिची जगण्याची चौकटच पार बदलून जाते. ती या चौकटीचं स्वरूपच पालटून टाकते की चौकटच तिच्या जीवनाच्या कक्षा बदलून टाकते असे अनेक प्रश्न ही उत्कंठामय कादंबरी निर्माण करते. तीस-पस्तिशीच्या आसपासची देखणी वासंती, नोकरीनिमित्त सतत बाहेरगावी फिरतीवर असलेला तिचा पती, शाळेत शिक्षिका असलेली आणि तिला सतत घालूनपाडून बोलणारी तिची हुशार, पण संशयी विधवा सासू आणि वासंतीची शाळेत जाणारी सात वर्षांची मुलगी असं हे एका सोसायटीत राहणारं चौकोनी कुटुंब. एक दिवस सकाळी सासूशी कडाक्याचं भांडण झाल्यावर ‘‘पुन्हा घरी येणार नाही’’ अशी प्रतिज्ञा करून रागाच्या भरात घराबाहेर पडलेली वासंती पुण्यातील एक मोठय़ा बस स्टॉपपाशी रडत असलेली तिथून जात असलेल्या एका चाळिशी ओलांडलेल्या गृहस्थाच्या नजरेस पडते. ते तिची आस्थेने विचारपूस करतात. चांगल्या घरातील स्त्राr दिसते हे ओळखून तिचं दुःख जाणून घेतात. ती उपाशी आहे हे लक्षात आल्याने तिला जवळच्या हॉटेलात नेऊन खाऊपिऊ घालतात आणि तिची समजूत घालून तिला पुन्हा घरी जाण्याचा सल्ला देतात. तिने त्यांची ओळख विचारताच ते आपलं व्हिजिटिंग कार्ड देतात. ते असतात चाळिशी ओलांडलेले, उंचपुरे, पिळदार शरीरयष्टीचे, वर्ण काळा असला तरी रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे युनिफॉर्ममध्ये नसलेले सेंट्रल एक्साईजचे सहाय्यक आयुक्त सुभानराव कलाल. त्यांचा हुद्दा आणि त्यांचं एकंदर रांगडं व्यक्तिमत्त्व पाहून तिला कलालांचा आधार वाटतो. ती घरी येते आणि पुन्हा संसाराच्या रहाटगाडय़ाला जुंपून घेते. मात्र तिच्या मनाच्या कप्प्यात खोल कुठेतरी कलाल दडून बसलेले असतात. नेहमी दुःखी असणारी ती मन मोकळं झाल्याने समाधानी आणि आनंदी वाटू लागते आणि तिथूनच सासूच्या मनात तिच्या स्वभावातील बदल लक्षात आल्याने तिच्याविषयीचा संशय बळावत जातो. तिला कलालांच्या भेटीची ओढ लागते. त्यांच्या चोरून भेटीगाठी सुरू होतात. मनमोकळय़ा गप्पांबरोबर शारीरिक आकर्षण वाढत जातं. कलाल तिला एका विख्यात विदेशी कंपनीत नोकरीला लावतात. तिच्यासाठी तिच्या इच्छेने स्वतंत्र फ्लॅट बुक करतात. त्यांचं हे लपून छपून चाललेलं प्रेम कुणालाच माहीत नसतं. एकदा तिची सासू तिला आणि एका अनोळखी पुरुषाला स्कूटरवरून एकत्र जाताना रस्त्यात पाहते आणि तिथूनच त्या संशयनाटय़ाच्या रहस्याला संघर्षमय वळण मिळतं. वासंतीच्या पतीलाही हे माहीत नसतं आणि सासू कुणालाच ते कळू देत नाही. हा सारा गुंता तिची सासू अक्कलहुशारीने कशा प्रकारे हाताळते हे पाहणे आणि त्या दोघींतील संघर्षाच्या चक्रावून टाकणाऱया खेळय़ा किती चतुराईने खेळल्या जातात, हार आणि जीत कुणाची होते हे पाहणेही उत्कंठाजनक आहे.

कलाल, वासंती आणि तिची सासू या तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती ही कादंबरी फिरते. त्या तिघांचे स्वभावविशेष, त्यांची मानसिक आंदोलने आणि त्यांच्या अंतर्मनात होत असलेली खळबळ लेखकाने प्रभावीपणे टिपली आहे. तिचा उपयोग कथानक वेगाने पुढे सरकण्यासाठी होतो. एक सात वर्षांची मुलगी पदरात असताना पतीकडून मनासारखे सुख मिळत नसताना आणि सासूचा जाच असताना केवळ स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी एखादी घरंदाज, संसारी आणि तीही मध्यमवर्गीय स्त्राr सर्वस्वी अनोळखी असलेल्या परपुरुषाकडे लोहचुंबकासारखी आकर्षित होते, अशा घटना तुरळक प्रमाणात समाजात घडत असतीलही, तरी त्यावरून एकंदर विवाहबाह्य संबंधांचे निकष लावून हे बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहे वगैरे समजण्यात अर्थ नाही. तरीही ही कादंबरी आजच्या टिकून राहिलेल्या आणि बिघडतही चाललेल्या कुटुंब आणि समाजव्यवस्थेबद्दल आणि त्यात विवाहित स्त्राrच्या होणाऱया कोंडीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते. कुटुंब, सामाजिक स्वातंत्र्य आणि स्वैराचार, लग्नसंस्था आणि विवाहबाह्य संबंध, नैतिक-अनैतिकता अशा अनेक गोष्टींवर विचार करायला लावते. संस्कृती आणि परंपरेच्या सीमारेषा ओलांडण्याइतपत आजची स्त्राr निर्ढावलेली आहे का? असाही प्रश्न येथे उपस्थित होतो. ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-आकांक्षा, अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रीभूत ठेवून बदलत चाललेले वास्तव काही प्रमाणात निश्चित कवेत घेते. त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यातील पट ती मांडते. तो मांडण्यासाठी वैयक्तिक दुःख, मोह, इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठsच्या धारणेतील संघर्ष ती अधोरेखित करते. या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या म्हणजे जागतिकीकरणाच्या ऐन उंबरठय़ावर उभे ठाकणाऱया काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात. त्याकडे केवळ रंजक म्हणून पाहून चालणार नाही. कुटुंब संस्थेचा एक कोपरा जितका उदार तितका संकुचितही आहे हे त्यावरून लक्षात येतं. संसारात स्त्राrकडे होणारे दुर्लक्ष, तिला गृहित धरण्याची वृत्ती, तिलाही स्वतःचं भावविश्व असतं हे न समजण्याइतकी उदासीनता यावर काही भाष्य न करताही अनेक प्रसंगांतून त्या विचारांना उठाव दिला आहे. स्त्राrला मोहात पाडून पुरुष नामानिराळा राहू शकतो, पण समाजबंधनाची चौकट पुरुषापेक्षा स्त्राrला जाचक ठरते हे अटळ सत्य कादंबरीच्या रूपाने पुढे येतं. कादंबरीचा ‘स्पॅन’ फार मोठा नसूनही ती कलाकृती म्हणून नक्कीच उजवी आहे.

चौकट वाटोळी
लेखक – अविनाश कोल्हे
प्रकाशन – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 264 किंमत – 350 रुपये