उद्यमशीलतेची जपणूक

36

>> मिलिंद खाडे

शिक्षण संपल्यावर किंवा ठरावीक वयात आल्यानंतर सर्वसाधारण माणसे उपजीविकेच्या मार्गाला लागतात. नोकरी किंवा व्यवसाय ही त्याची उपजीविकेची माध्यमे असली तरी तीच त्याची स्वतःची उर्वरित आयुष्याची स्वतःसाठीची ओळख बनते. त्याचे संपूर्ण आयुष्य सुखसमाधानापासून ऐश्वर्य, संपत्ती आणि आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींच्या बाबतीत त्याच्या कामाशी निगडित नव्हे तर अवलंबूनच असते. नोकरी देणारा उद्योजक असो किंवा नोकरी करणारा नोकरदार, दोघांनाही कामासंदर्भातील भावभावना असतातच. म्हणूनच औद्योगिक मानसशास्त्र हा विषय फक्त नोकरदारांचा न राहता दोघांसाठीही महत्त्वाचा ठरतो.

या दृष्टीने नुकतेच मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ हे नीलांबरी जोशी यांनी लिहिलेले पुस्तक खूपच महत्त्वाचे आहे. औद्योगिक मानसशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे, पण त्यांना तो शैक्षणिकदृष्टय़ा मांडायचा नाही. कुठल्याही औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षणानंतर मनुष्य आपला कामधंदा सुरू करतो, त्यात कसब प्राप्त करतो आणि ठरावीक क्षमतेपर्यंत पोहोचतोही. पण आजही हिंदुस्थानसारख्या देशामध्ये नोकरीला किंवा व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी काम कसे करावे किंवा करून घ्यावे याचे प्रशिक्षण मिळत नाही. बहुतांश वेळा अनुभवातूनच दोघांचेही प्रशिक्षण होत असते, परंतु यातून जाणारा वेळ आणि असंख्यांना येणारे अपयश आणि नुकसान हे या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. ते प्रशिक्षण असते दोन्ही बाजूंच्या मनोव्यापाराचे, हेच मनोव्यापाराचे शिक्षण हे पुस्तक देते, जी आजच्या काळातील गरज आहे.

पुस्तकाची सुरुवात औद्योगिकतेच्या इतिहासाने (प्राचीन आणि अर्वाचीन अशा दोन्हीही) होते. त्यामुळे विषयात शिरायला तर मदत होतेच, पण गुहेच्या तोंडाशीच उत्सुकता वाढल्याने आतल्या प्रवासाचा अंदाज येतो. हा प्रवास ज्ञान आणि मनोरंजनाने, प्रश्नांनी आणि उत्तरांनी भरलेला आहे. विषयाची मांडणी करताना त्याची विभागवार प्रकरणे केली आहेत.

पहिल्या भागात मानवी ‘उत्पादन’ या संकल्पनेपर्यंतचा प्रवास, विविध देशांत वेगवेगळय़ा टप्प्यांवर झालेली औद्योगिक क्रांती आणि त्यातून औद्योगिक क्षेत्रात झालेला मानसशास्त्राचा प्रवेश आणि प्रवास अभ्यासपूर्ण आणि रंजकपणे समोर येतो.

एरवी शैक्षणिक अभ्यासक्रमात अवघड वाटणाऱ्या विविध थिअरीज किंवा मॉडेल्स लेखिकेने सामान्य वाचकालाही समजतील अशा शब्दांत, उदाहरणांसह मांडल्या आहेत. यात फ्रेडरिक टेलरच्या सायंटिफिक मॅनेजमेंटपासून मॅकग्रेगॉरच्या थिअरी एक्स आणि थिअरी वायपर्यंतचा समावेश होतो. तो मांडताना कालानुक्रम कुठेही सुटत नाही हे विशेष. त्यामुळेच पुढची थिअरी किंवा टप्पा समजायलाही सोपे जाते. यातूनच पुढच्या प्रकरणात येणारे व्यक्तिमत्त्वातील फरक आणि मूल्यमापनाच्या पद्धती यात होत गेलेल्या बदलांचा प्रवास समजून घ्यायला सोपा होतो आणि वाचक विषयाला पूर्णपणे जोडला जातो.

दुसरा भाग म्हणजे प्रत्येक वाचकाचा स्वतःचा प्रवास आहे. स्वतःचा प्रवास म्हणताना काम करतानाचे अनुभव, ताणतणाव किंवा तत्संबंधी गोष्टी आपण स्वतःशी तपासून पाहतो. त्यातून सापडत जाणारी उत्तरे ही उर्वरित आयुष्यासाठी काम करण्याचे ‘प्रशिक्षण’ देणारी किंवा मार्गदर्शक ठरतात. आपण कुठल्या साच्यात किंवा चौकटीत बसतो हे समजले की, दोन्ही बाजूंना निर्णय घ्यायला सोपे जाते. म्हणूनच हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या भागात मूल्यमापनाच्या, क्षमतांच्या मार्गदर्शन करणाऱ्या विविध तक्त्यांचा कसा वापर केला गेला किंवा केला जातो यांची सुटसुटीत मांडणी आहे.

उद्योजकतेचा आणि औद्योगिक मानसशास्त्राच्या भविष्याचा वेध घेतानाच कामामुळे येणारे आजारपण किंवा अस्वास्थ्य याचा अभ्यास तिसऱया भागात येतो. सर्वत्र उत्पादन क्षेत्रात येत चाललेले ऑटोमेशन त्यातून बदलत गेलेले किंवा बदलत चाललेले कामगार विश्व आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकतेतील बदल हा अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय मांडला गेला आहे. कृत्रिम बृद्धिमत्ता किंवा यंत्रमानव या गोष्टींनी भविष्यात काय मांडून ठेवलेय याची चुणूक वाचायला मिळतेच, पण आता तरुण किंवा मध्यम वयात असणाऱ्या नोकरदार आणि छोटय़ा उद्योजकांना मार्गदर्शक ठरू शकेल असा हा विषय आहे. हे सर्व वाचत असताना आपण स्वतः आणि देश नेमके कुठे उभे आहोत याचे भान यायला हरकत नाही.

लेखनशैली आणि क्षमता या अंगानेही या पुस्तकाबद्दल लिहता येऊ शकते. एकेका विषयाचा अभ्यास आणि लेखन करताना वेगवेगळे संदर्भ दिले आहेत. त्यामुळे अभ्यासापूर्वीही लेखिकेने किती वाचले, पाहिले आणि ऐकले असेल याची कौतुकमिश्रित खात्री वाटत जाते. औद्योगिक मानसशास्त्र या विषयावर मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे म्हणून त्याचे महत्त्व आहेच, पण त्याहीपेक्षा आजच्या दैनंदिन जीवनासाठी ‘प्रशिक्षण’ देणारे ते स्वतंत्र पुस्तक आहे. मानसशास्त्राच्या अंगाने स्वतःचा व्यावसायिक शोध सोपे करणारे पुस्तक आहे.

कॉर्पोरेट कल्लोळ
लेखक – नीलांबरी जोशी
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
मूल्य – रुपये 350/-

आपली प्रतिक्रिया द्या