परीक्षण – जाणिवांचा गझलाविष्कार

>> साबिर सोलापुरी

अस्सल गझलेत कमालीची विसंगती असते. चकवणारी चमत्कृती असते. धक्का देणारी कलाटणी असते. गझलेची अशीच मांडणी असते. शब्दातील बारकावे, आशयातील हेलकावे, विषयातील नावीन्यपूर्णता यामुळे प्रत्येक शेर रसिकाला वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो. यातील अनुभव चटकन मनाला भिडतो. म्हणून तर गझल अन् रसिकांचं अतूट नातं निर्माण झालंय्. गझलेची ही सर्व गुणवैशिष्टय़े ज्यांच्या गझलांमधून एकजीव उमटलीयत. एकवटलीयत असे तीर्थक्षेत्र पंढरपूरचे वैभव कुलकर्णी हे मराठी गझलेच्या पटलावरील आजच्या घडीचे लक्षणीय गझलकार आहेत.

कुलकर्णी हे व्यवसायाने फार्मासिस्ट असले तरी त्यांची भाषा क्लिष्ट नाही. त्यांच्या गझलांमध्ये कुठेही बोजडपणा नाही किंवा शब्दांचं अवडंबर माजवणं नाही. रोजच्या जगण्यातील अगदी साध्यासुध्या गोष्टींना त्यांनी शेरांचे रूप दिले आहे. ज्यात अंतरिक सहवेदनेनं भवताल अन् माणसं समजून घेण्याचा समंजसपणा आहे. आपण एकमेकांशी तितक्या सहजतेने संवाद करतो तसेच त्यांचे शेर वाचकांशी संवाद करत येतात अन् वाचकांचेच होऊन जातात. त्यांच्या संवादी गझला वाचताना त्यांच्या परिपक्व विचारांची पातळी कळत जाते.

वैभव कुलकर्णी यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘गझल-विठ्ठल’ हा लक्षवेधी गझलसंग्रह त्यांच्या प्रगल्भ जाणिवांचा गझलात्मक अविष्कार आहे. हा गझलसंग्रह वाचताना याचा पानोपानी प्रत्यय येत राहतो. गझल साधनेवर, सिद्धीवर त्यांची नितांत निष्ठा असल्याने त्यांना प्रसिद्धीशी फारसं देणंघेणं नाही. इथं प्रसिद्धी मिळवणे फार सोपी गोष्ट आहे. त्यासाठी लेखनास रियाजाची, चिंतनाची डूब असलीच पाहिजे अशी बिलकूल अट नाही. याबाबतीत ते त्यांचं रोखठोक मत असं नोंदवतात.

चारदोन आसवे नि एक दुःख च्यायला
काय लागते इथे प्रसिद्ध व्हायला

असण्यापेक्षा नुसत्या दिसण्याचा गझलकराला तिरस्कार वाटतो. दुःखाचा टाहो बेंबीच्या देठापासून फुटलेला असेल तर लेखन श्रेष्ठतम दर्जाचं घडतं. सतत गझल चिंतनात आकंठ बुडून गेलेले वैभव कुलकर्णी हे गझल रसिकांच्या मनातील भावभावना स्वतःच्या काळजातून कागदावर उतरविण्यात अग्रेसर आहेत. त्यांचा प्रत्येक शेर रसिकांना आपलीच कैफियत वाटतो. तो त्या भावनेशी तादाम्य पावतो. ‘अरे हे माझंच म्हणंणं आहे, मला असं म्हणायचं होतं.’ याची त्याला जीवनवानूभूती येते. इतकं त्यात आपलेपणा भरलेला आहे.

विठ्ठलाशी त्यांची श्वासाइतकी जवळीक आहे. म्हणूनच ते केवळ अध्यात्मिक दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक संबंधानेही त्यांच्या मनाला पोखरणारे अनेक प्रश्न विठ्ठलाला विचारतात. भूतकाळाचा धांडोळा घेत घेत भविष्यकाळाचाही वेध घेतात.

काय भन्नाट दिवस होते ते
गायचो रोज मी तुझी गाणी

असा भूतकाळ जागवत भविष्यही तितक्याच ठामपणे नोंदवून जातात.

तुला होईल अठ्ठाविस युगांचा घोर पस्तावा
असा ही शेर आयुष्यामध्ये करणार आहे मी

परिस्थितीला बिनधास्तपणे भिडण्याचा वृत्तीमध्ये पक्का निर्धार असला की लेखनास धार आल्याशिवाय राहत नाही. अशा कितीतरी धारदार शेर या गझलसंग्रहात वाचावयास मिळतात. असं असलं तरी कवीची विठ्ठलावरची श्रद्धा तसुभरही नाही ढळत. ते विठ्ठलाचे गूज गातात, विठ्ठलाशी बोलतात याचं त्यांना सात्त्विक समाधान आहे मनात कृतार्थता आहे.

मी गझल केली बरे केले म्हणा
विठ्ठलाशी बोलता आले मला

जीवनात किती सहनशीलता ठेवायची, किती कळ सोसायची, किती प्रतीक्षा करायची, उपायांचा किती भरवसा ठेवायचा याला काही मर्यादा आहे की नाही. हे काळाचं कसलं औषध? जखमेचं वय वाढत चाललंय. या वाढत जाण्याला काही धरबंद आहे की नाही. जखमेचं वय चक्क अठ्ठावीस युगाइतकं झालं तरी यावर काळाचं औषध नाही सापडत. विठ्ठल विटेवर अठ्ठावीस युगं कसा काय उभा राहिला असेल. याचं आश्चर्य कवीला वाटतं. जगण्यातली जखम असो की औषध. प्रत्येक गोष्ट कवी विठ्ठलाला स्मरून उपस्थित करतो.

तसा भरवसा आहे माझा काळाच्या औषधीपणावर
पण माझ्या जखमेचे झाले अठ्ठावीस युगा इतके वय

विठ्ठल इतका स्थितप्रज्ञ कसा, एकाच विटेवर तो युगानयुगं उभाच आहे. विठ्ठल एकसारखा उभा राहून थकत नसेल का? त्याला कंटाळा येत नाही का? अठ्ठावीस युगं विटेवर नुस्तं उभं रहाणं हे जरा जास्तच झालं, असं कवीला वाटतं तो विठ्ठलाला म्हणतो जी वाट तुला कधीच कुठं घेऊन नाही जात ती वाट आता तू सोडून दे. मी त्या विटेखालूनच एक नवा रस्ता काढला आहे. त्या रस्त्यानं तू चालत राहा. भक्तांशी बोलत राहा, भेटत राहा.

कोठेच नेत नाही ती सोड विठ्ठला तू
मी काढला विटेच्या खालून एक रस्ता!

विठ्ठला तुझा उघडेपणा मी कुणाच्याही नजरेस पडू नाही देत. माझ्या गझलांमधून मी तुला झाकून घेतो. मी तुला नित्यनवनवे शब्दांचे वस्त्र देतो. त्या वस्त्रात तुझे साजिरे-गोजिरे रूप किती बरे खुलून दिसते. तू भाविकाचं मन मोहून घेतोस. मी तुला झाकून घेण्याचं कारण उघड आहे. तू माझ्या मनाची लाज आहेस. तू माझी आबरू आहेस. अशी कवीची धारणा आहे.

मनाच्या आतला विठ्ठल मनाबाहेरचा विठ्ठल
मला हाही जमत नाही मला तो ही जमत नाही

कवी विठ्ठलाशिवाय जगण्याची कल्पनाच नाही करू शकत. त्याच्या ध्यासात, श्वासात, रोमारोमात विठ्ठल सामावलेला आहे. विठ्ठलाविना आयुष्यात आलेला रिकामेपणा त्याला सोसायला नाही जमत. मनावर विठ्ठलाचं ओझं घेऊन वावरण्याची कवीला जणू सवयच जडलीय्. मनावर विठ्ठलाचं ओझं वाहणं त्यातच जीवनाची कृत्यकृत्यता समजावणारा हा कवी आहे.

हे रिकामेपणा मला सोसायला जमते कुठे
ह्या मनावर विठ्ठलाचे एक ओझे पाहिजे

कवीला असं वाटतं की माझ्यात अन् विठ्ठलात एक घट्ट ऋणानुबंध आहे. मी माझे कित्येक शेर बुडवले होते त्या शेरांवर तर विठ्ठल तरला आहे. मी विठ्ठलाचा अन् विठ्ठल माझा आहे. मी विठ्ठलाला अन् विठ्ठल मला वेगळं करूच नाही शकत. इतके आम्ही एकरूप झालो आहोत. माझं जगणं-मरणं विठ्ठलासाठीच आहे. विठ्ठलाला हे माहीत असते की मी पुन्हा त्याच्याच पायाशी येणार आहे. मी अखेरचा शेरही विठ्ठलासाठीच लिहून जाणार आहे. तेव्हा विठ्ठलाने मात्र माझ्यासाठी पाळणा गायचा आहे.

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला ‘पाळणा’ गायचा आहे

वैभव कुलकर्णी यांची गझलेच्या आकृतिबंधावर विलक्षण पकड आहे. त्यांनी योजिलेल्या रदीफ काफियावरूनच त्यांच्या कल्पनांची भरारी लक्षात येते. गझल लिहिणारे गझलकार अन् गझल समजून घेणारे रसिक या दोघांनाही ते गझलेसंबंधीच्या अनोख्या भाष्यासह गझलेच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. ही बाब महत्त्वाची आहे

गझल-विठ्ठल – गझलसंग्रह
गझलकार – वैभव कुलकर्णी
प्रकाशक – समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठ – 83, मूल्य – रुपये 130/-

आपली प्रतिक्रिया द्या