परिक्षण – वास्तववादी कथा

>> रागिणी जगदाळे

‘हराकी’ या शीर्षकातूनच वाचकांची उत्सुकता शिगेला पोहचते. हराकी म्हणजे काय, असा प्रश्न पडतो. कादंबरी वाचताना या प्रश्नाचा उलगडा होत जातो. लेखक मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कादंबरी नुकतीच तेजश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. ’यमणाप्पा’ या दलित समाजातील व्यक्तीची भावविभोर करणारी कहाणी यातून वाचायला मिळते.

कित्येक प्रथा, परंपरा आणि त्यामागील उद्देश यापासून आपण अनभिज्ञ असतो. या प्रथा का सुरू झाल्या? त्यामागील उद्देश काय? या व अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीतून लेखकाने केला आहे.

अंत्यसंस्कारामधला एक विधी, ज्यात दलित समाजातील एखादी व्यक्ती मृताम्याला शांती मिळावी म्हणून उद्घोषणा करते आणि सर्व उपस्थितांसोबत हराळीच्या काडय़ा जळत्या सरणावर भिरकावते. असे हराकीचे एकंदरीत स्वरूप असले तरी प्रदेशपरत्वे त्यात किंचित बदल होत असल्याचे आढळून येते.

ग्रामपंचायतीचा सफाई कामगार म्हणून काम करत करत गावातील लोकांची छोटी मोठी कामे करणे, वेळप्रसंगी सांगावा देणे, स्मशानभूमीत हराकी म्हणणे इत्यादी समाजाने नेमून दिलेली कामे महार असणारा यमणाप्पा इमानेइतबारे करत असतो. तिकडे स्मशानात रॉकेलने कुणाचा तरी शेवट व्हायचा आणि त्यातून इकडे यमणाप्पाच्या घरी चूल पेटायची, दिव्याला तेल मिळायचं. त्या दिव्याच्या उजेडात त्याची मुले अभ्यास करायची. तेव्हा त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न ही मुले पूर्ण करतील आणि उज्ज्वल भविष्य घडवतील असा विश्वास वाटत असे.

या कादंबरीत यमणाप्पा या मुख्य पात्रासोबत येणारी सखू, शाम, कॅप्टनसाहेब आणि त्यांच्या घरातील इतर सदस्यांना पात्रचित्रणातून लेखक जिवंत करतातच पण मृत व्यक्तींना त्यांच्या आठवणी, प्रसंगचित्रणातून रेखाटताना तीसुद्धा जिवंत झाल्याचा भास होतो. हेच मनोहर भोसले यांच्या लेखनाचे कौशल्य म्हणता येईल. छकुली, खुळा आत्माराम, पैलवान बाळकून अण्णा, भिकाजी महाराज इत्यादींचे यमणाप्पाच्या नजरेतून केलेले अचूक वर्णन मनात घर करून राहते.

दलित जाणिवा व्यक्त करणे दलित लेखकालाच उत्तम जमेल, हे खरेच! मात्र मनोहर भोसले या दलितेतर लेखकाने आपल्या साहित्यातून दलित जाणिवा व्यक्त करताना कुठेही कमतरता ठेवलेली नाही. ते दलित समाज, व्यक्ती आणि त्यांच्या संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. त्या दोहोंतील अद्वैत कादंबरीच्या शेवटच्या टप्पातील उद्धृत केलेल्या ‘आपल्या माणसाच्या मृत आत्म्याला शांती मिळावी असे ज्याला वाटेल त्याला स्वतः महार व्हावं लागणार होतं’ या विधानातून प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही.

‘हराकी’ या विधीसंदर्भातील मान्यवर लेखकांची पुस्तके वाचून, पुराणांचा अभ्यास करून, सामाजिक आणि धार्मिक मान्यतेचा आधार घेऊन केलेले लेखन अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनले आहे. एखाद्या गोष्टीचा मुळापर्यंत जाऊन शोध घेतल्यामुळे लेखकाच्या दांडग्या व्यासंगाची प्रचीती कादंबरीत पानोपानी येत राहते. श्रद्धा-अंधश्रद्धा याचा विचार करायची सर्वस्वी जबाबदारी वाचकांवर सोपवून त्यांनी तटस्थपणे वास्तवाचे दर्शन घडवले आहे. ‘मृत्यू अटळ आहे’ या अंतिम सत्याचा उलगडा करण्यासाठी ’हराकी’ या प्रथेचा आधार घेतल्याचे अर्पणपत्रिकेतील पुढील ओळींतून जाणवते. ‘एखाद्याच्या अंतयात्रेत सामील झाल्यानंतर त्याला त्याच्या ठिकाणावर पोहचवायला जात आहोत असं समजून चालणार नाही. खरंतर, तिरडीवर आडवा झालेला माणूस आम्हाला आमचं ठिकाण दाखवायला नेत असतो.’

गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहावेत यासाठी हराकीसारख्या प्रथांना सुरुवात झाली असेल तर या प्रथा जाचक न ठरता, उज्ज्वल भविष्याचे द्योतक बनतील असे वाटते. गावसभेत झालेल्या हराकी बंद करण्याबाबतच्या चर्चेतून लेखकालासुद्धा हेच सुचवायचे आहे. यमणाप्पाचा गावावर, गावातील माणसांवर जीव होता. त्याच्याशी आपुलकीनं बोलणारे, वागणारे होतेच. मात्र नव्या पिढीला त्याचं महत्त्व वाटत नव्हतं, ते त्याची चेष्टा करायचे, तेही तितकंच खरं. कर्करोगाने आणि गावच्या बदललेल्या रूपामुळे तो अस्वस्थ व्हायचा.

‘हराकी’ मधून जिवंत मानवाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दाखवता दाखवता मृत्यूनंतर मानवी देहाची घेतली जाणारी कठोर परीक्षा यांचे भावस्पर्शी वर्णन लेखक करतात. कादंबरी वाचताना वाचकांच्या काळजाला चटके बसतात आणि वाचकांचे डोळे पाणावतात. हराकीबरोबरच वीर काढणं, श्रीबंधन, श्रीयाळ षष्ठाr इत्यादी प्रथा-परंपरा, सण-उत्सव तसेच इतरही श्रद्धा-अंधश्रद्धांचा प्रसंगपरत्वे आढावा घेतल्याचे दिसून येते.

जन्माला येताना माणूस रिकामा येतो आणि मृत्यूनंतरही रिकामा जातो, हे कोरोना महामारीच्या या काळात लोकांना चांगलेच समजून चुकलंय. तरीही काही स्वार्थी लोक याही परिस्थितीत लोभीवृत्तीने वागताना दिसतात. अशा लोकांना या पुस्तकांतून आपला शेवट काय ते अनुभवता येईल आणि ते स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवतील अशी आशा वाटते. ही साहित्यकृती जन्म आणि मृत्यूच्या मधले अंतर पार करणाऱया सर्वांच्या मनाला शांती मिळवून देणारी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यमणाप्पाची काळाच्या ओघात गावाची गौरवशाली परंपरा मोडकळीस आल्याचे पाहून झालेली मानसिक अवस्था व कर्करोगाने त्रस्त देहाची चाललेली तगमग आणि शेवटी त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्मशानातील चितेवरील उडालेल्या ठिणगीतून समाजप्रबोधनाची एक ठिणगी उपस्थित गावकऱयांच्या मनातून धगधगत राहते. याची चपखल शब्दांत मांडणी ‘हराकी’तून केली आहे.

दर्जेदार रूपात ही कलाकृती तेजश्री प्रकाशनने निर्माण केली असून समर्पक व आशयघन असे मुखपृष्ठ चित्रकार किशोर माणकापुरे यांनी साकारले आहे. शीर्षक, मुखपृष्ठ, कथानक, पात्रचित्रण, संवादलेखन आणि प्रसंगचित्रण या सर्वच पातळ्यांवर ही कादंबरी उठावदार बनली आहे. त्यामुळे आपल्या विचार, आचार व दृष्टिकोनात प्रगल्भता आणण्यासाठी आवर्जून वाचावी आणि संग्रही ठेवावी अशीच ही कलाकृती आहे.

‘हराकी’
लेखक ः मनोहर भोसले
प्रकाशक ः तेजश्री प्रकाशन
पृष्ठs ः 189, मूल्य ः रुपये 300/-

आपली प्रतिक्रिया द्या