परीक्षण – कधीच संपू नये अशी चर्पटपंजरी

195

>> मल्हार कृष्ण गोखले

आद्य शंकराचार्यांचे एक स्तोत्र आहे – ‘भज गोविन्दम्, भज गोविन्दम्, गोविन्दम् भज मूढमते.’ उत्कृष्ट काव्य, नादमधुरता, गेयता यांसाठी हे स्तोत्र प्रसिद्ध आहे आणि लोकप्रियही आहे. त्याला म्हणतात ‘चर्पटपंजरिका स्तोत्र.’

परंतु रूढ भाषेत ‘चर्पटपंजरी’ या शब्दाला नेमका विरुद्ध अर्थ प्राप्त झालेला आहे. एखाद्या माणसाची तीच तीच वटवट ऐकून वैताग आला की, आपण म्हणतो, ‘‘पुरे कर तुझी चर्पटपंजरी.’’

शिरीष कणेकरांच्या ‘चर्पटपंजरी’ या ताज्या लेखसंग्रहात वरील दोन्ही गुण नाहीत. म्हणजे कणेकर भक्तिरसपूर्ण वगैरे कधीच लिहीत नाहीत, लिहिणारही नाहीत. त्यांनी असे काही लिहिण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या वाचकांना हसूच येईल.

…आणि त्यांच्या लेखनाला ‘पुरे कर’ असे तर वाचक कधीच म्हणणार नाहीत. कारण साप्ताहिक स्तंभलेखन करताना कारणपरत्वे कधी कधी तेच विषय पुन्हा येत असले तरी कणेकर ते इतके वाचनीय करतात की, त्यांचा कधीच कंटाळा येत नाही. सुनील गावसकरचा खणखणीत कव्हर ड्राईव्ह किंवा गुंडाप्पा विश्वनाथची नाजूक स्क्वेअरकट नाही का, आपण पुनः पुन्हा पाहायचो?

कणेकर भक्तिरसपूर्ण वगैरे कधीच लिहीत नाहीत असे मी म्हटले खरे, पण नेमके सांगायचे तर त्यांचे भक्तीचे विषय वेगळे आहेत.

कसोटी क्रिकेट सामन्यांच्या ऐन बहराच्या काळातला खराखुरा क्रिकेटचा खेळ हा त्यांच्या भक्तीचा विषय आहे. साधारण 1945 ते 1980 हा जो हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ, तो त्यांच्या भक्तीचा विषय आहे आणि त्याबद्दल ते लिहायला लागले की, कोणत्याही संतकवीइतकेच ते भक्तिरसात चिंब होतात नि वाचकांनाही चिंब करून सोडतात.

या विषयांव्यतिरिक्त समकालीन सामाजिक समस्यांवरही ते चुरचुरीत भाष्य करतात. आधुनिकतेच्या रेटय़ाने मराठी मध्यमवर्गाची कुटुंब व्यवस्था चांगलीच डळमळली आहे. मुले कायमची परदेशी जात आहेत वा जाऊ इच्छित आहेत. पैसा, प्रतिष्ठा आणि शिक्षण यांच्या फाजील अहंकाराने ग्रासलेली नवी पिढी फटाफट घटस्फोत घेत आहे. जुनी पिढी घटस्फोट घेऊ शकत नाही म्हणूनच केवळ एकत्र राहते आहे अन्यथा ते एकमेकांना विटले आहेत. या आणि अशा समस्यांवरचे कणेकरांचे लेख म्हणजे उत्कृष्ट अशी अर्कचित्रे आहेत.

आपल्याकडे लोकांना व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे यातला फरकच माहीत नव्हता. चित्रकार वसंत सरवटय़ांनी तो प्रथम सांगितला. व्यंगचित्र हे फक्त व्यंग दाखवते, उपहास करते, खिल्ली उडवते तर अर्कचित्र त्या विषयाचा समग्र अर्क-अर्थ आपल्यासमोर मांडते. ते पाहताना आपण हसतो, पण हसता हसता अंतर्मुख होतो. घटस्फोट, वृद्धाश्रम, वटपौर्णिमेला वडाला फेऱया अशा नेहमीच्या विषयांवर चुरचुरीत भाष्य करताना कणेकर अतिशय सहजतेने अशी शब्दरूपी अर्कचित्र रेखाटतात.

एकंदरीत शिरीष कणेकरांची प्रस्तुत ‘चर्पटपंजरी’ नेहमीप्रमाणेच सदाबहार. चित्रकार विकास सबनीस यांची सुंदर प्रस्तावना, अविनाश कुंभार यांचे मिस्कील मुखपृष्ठ आणि नवचैतन्य प्रकाशनाची सुबक निर्मिती.

 

लेखक : शिरीष कणेकर

प्रकाशक : नवचैतन्य

पृष्ठ : 304 मूल्य : 390 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या