माझे मूल माझे चैतन्य

47

>> नमिता दामले

मुलं घडताना’ या प्रस्तुत पुस्तकाचे लेखक डॉ. अद्वैत पाध्ये हे एक सुविख्यात मानसोपचारतज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचे लेख हे नुसत्या अभ्यासातून नव्हे तर त्यांच्या समुपदेशनाच्या अनुभवातून नक्की काय-काय अडचणी पालकांना येतात त्याचा विचार करून लिहिले गेले आहेत. ‘शिक्षण विवेक’ या मासिकामध्ये व नंतर साप्ताहिक ‘विवेक’मध्ये प्रसिद्ध झालेले हे लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत.

मूल वाढवणं ही सगळय़ाच आई-वडिलांकरिता एक अत्यंत आनंद देणारी गोष्ट असते. जशी मुलं या जगात नवीन असताता तसेच आईवडीलही प्रथमच पालक होत असतात. मुलांना शिकवता-शिकवता आपणही अनेक गोष्टी शिकत असतो आणि एक पालक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही आपली अधिक चांगली जडणघडण होत असते. या सर्व प्रक्रियेकडे डोळसपणाने बघण्याची व यातून अधिकाधिक आनंद मिळवण्याची, समाधान मिळवण्याची दृष्टी हे पुस्तक देईल.

मुलांचा शिकण्याचा वेग हा आपल्या शिकवणीच्या वेगापेक्षा नेहमीच जास्त असतो. मुलं पालकांच्या वाणीतून नाही तर त्यांच्या कृतीतून नैसर्गिकरीत्या शिकत असतात हे सगळय़ा पालकांनी सदैव लक्षात ठेवले तर अनेक समस्या टळू शकतात. बालक-पालकांमधील सुसंवाद मोलाची भूमिका बजावतो. मुलांना तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या वेळेचे मोल अधिक असते. त्याची भरपाई दुसऱया कशानेही होऊ शकत नाही. मुलांच्या केवळ बौद्धिक प्रगतीवर भर देण्याऐवजी त्यांच्या व्यावहारिक, भावनिक प्रगतीकडेही लक्ष दिले पाहिजे.

वाचनामधून, कार्यक्रमांमधून, समाजमाध्यमांमधून आपल्याला उत्तम ज्ञान मिळत असते ते कृतीत उतरवले पाहिजे. मग स्वमग्नता, अध्ययन अक्षमता, गतिमंदता, लैंगिक शिक्षण, आंतरजालाचे व्यसन इ. समस्यांमधून वेळीच मार्ग काढता येईल. गरज असल्यास तज्ञांची मदतही योग्य वेळी घेता येईल. तरुण वयात आत्महत्या करणाऱयांचे प्रमाण त्यामुळे नियंत्रणात येईल. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक केवळ पालकांनाच नव्हे तर मुलांच्या इतर नातेवाईकांनाही मदत करील.

मुलं घडताना
लेखक – डॉ. अद्वैत पाध्ये
प्रकाशन – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई,
पृष्ठ- १२८
मूल्य -१४०

आपली प्रतिक्रिया द्या