नक्षलवादी जीवनाचा प्रत्ययकारी वेध

>> श्रीकांत आंबे

नक्षलग्रस्त आणि नक्षलत्रस्त जीवनावरील सुरेश पाटील यांची ‘नक्षलबारी’ ही कादंबरी तेथील जीवनाचा, जगण्याचा आणि मूळ समस्येचा कलात्मकरीतीने वेध घेणारी आहे. प्रत्यक्ष त्या नक्षलग्रस्त आदिवासी परिसरात राहून त्यांचे असुरक्षित जिणं पाहून, तिथे भटकंती करून, आदिवासी, पोलीस अधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन तिथला जीवनानुभव लेखकाने प्रचारकी थाट न आणता लालित्यपूर्ण पद्धतीने कादंबरीरूपात प्रत्ययकारीपणे साकार केला आहे.

या विषयावर कादंबरी लिहिताना मूळ विषय सर्वांना परिचित असला तरी त्याचं सामाजिक आणि राजकीय भान असण्याबरोबरच साहित्य आणि जीवनमूल्याच्या कसोटीवर लेखन उतरलं तरच ते जिवंत, रसरशीत आणि प्रत्ययकारी वाटतं. या कादंबरीतील प्रत्येक प्रसंगात प्रथमपासून शेवटपर्यंत हे भान राखल्यामुळेच लेखकाच्या प्रतिभासामर्थ्याने दर्जेदार साहित्यमूल्य असलेल्या कादंबरीला न्याय दिला आहे. निसर्गाच्या वर्णनांपासून आदिवासी जीवनशैलीपर्यंत या कथानकातील एकेक प्रसंग एखाद्या चित्रपटासारख्या वेगवान गतीने डोळय़ासमोरून सरकत जात असताना तो मनात विचारांचं वादळ निर्माण करून जातो. या कथानकातून नक्षलवादी चळवळीचं, तिच्या रक्ताला चटावलेल्या वृत्तीचं, उद्देशविरहित सूडबुद्धीचं, भरकटलेल्या अवस्थेचं आणि नक्षलवादाविरुद्ध उठाव करण्यास आता हळूहळू सज्ज होत असलेल्या मनांचंही दर्शन घडतं. मुळात ही चळवळ भ्रष्ट शासनव्यवस्था, आदिवासींना नाडणारे जमीनदार, सावकार, व्यापारी यांना ठार मारून धडा शिकवण्यासाठी सुरू झाली. रक्तरंजित क्रांती करून सरकार आणि पोलीस यंत्रणेला सळो की पळो करून सोडणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. क्रांतीचा मार्ग बंदुकीच्या नळीतून जातो हे माओचं तत्त्वज्ञान त्यांच्या चळवळीचं मुख्य सूत्र होतं. हा शोषक आणि शोषित यांच्यातील लढा आहे, असं भासवलं गेलं. देशातील स्वतःला विचारवंत आणि बुद्धिवादी समजणारे काही तथाकथित विद्वानही छुपेपणाने नक्षल्यांच्या मागे उभे राहिले. त्याशिवाय विदेशातून आधुनिक शस्त्र्ाास्त्र्ाांचा पुरवठा आणि सुसज्ज संपर्क यंत्रणा हे त्यांचं हुकूमी अस्त्र्ा होतं. त्यांच्या जोरावरच स्थानिक आदिवासींना हाताशी धरून त्यांनी घातपात आणि रक्तरंजित सूडनाटय़ सुरू केलं. आपल्याच बांधवांच्या रक्ताला चटावलेल्या नक्षलवाद्यांनी जणू या डोंगरदऱयांच्या परिसरात आपलं साम्राज्य निर्माण केलं. हे आदिवासी भूभाग आपल्यापासून मनाने, भावनेने आणि सुधारणांच्या दृष्टीने तुटलेलेच राहिले. या कादंबरीचा नायक पोलीस इन्स्पेक्टर माही या नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून या निसर्गरम्य, दाट झाडीच्या डोंगरदऱयांनी आणि आदिवासी पाडय़ांनी विखुरलेल्या प्रदेशात नियुक्ती झाल्याने पोलीस अधिकारी म्हणून येतो आणि त्यानंतर या प्रदेशातील नक्षलवाद्यांशी केवळ ताकदीनेच नव्हे, तर बुद्धिचातुर्याने झुंज देऊन त्यांना कसे जेरीस आणतो याची थरारक चित्तरकथा असलेली ही कादंबरी त्यातील प्रत्येक प्रसंगाद्वारे या नक्षलग्रस्त जीवनाचे आणि चळवळीचे अनेक पदर उलगडून दाखवते, तेही अगदी सहजपणे. आपल्याभोवतीच हे सारं घडत असल्याचा भास होतो, इतका जिवंतपणा या लेखनात आहे. इन्स्पेक्टर माहीच्या छोटय़ा संसाराचं भावविश्व, प्रेमापेक्षा कर्तव्यनिष्ठsला महत्त्व देणारी त्याची देशभक्ती, बेडर वृत्ती यासह नक्षलवाद्यांच्या बारीक-सारीक हालचालीचे तपशील, त्यांना सामील असलेले आणि कायम त्यांच्या दबावाखाली असलेले नेते आणि अधिकारी, नक्षल्यांचा घातपात करण्याच्या आणि पोलिसांना चकवा देण्याच्या पद्धती याचा धांडोळा कथानकाच्या ओघात एकजीव झाल्यासारखा सुरूच राहतो. नक्षलवाद्यांच्या आश्रयाने सुखचैन उपभोगत आश्रमात राहणाऱया ढोंगी कुंडास्वामी बाबाला मोहात पाडून त्यांच्याकडून नक्षल्यांची माहिती घेणाऱया तरुण पत्रकार महिलेच्या धाडसाची कहाणीही रोमांचकारी आहे. नक्षलवाद्यांना मदत करणारे व्यापारी, विकासकामात अडथळे आणणारे नक्षलवादी पोलिसांबरोबरच त्यांच्या होणाऱया गनिमी काव्याच्या चकमकी आणि या साऱयाला व्यापून राहिलेल्या निसर्गाचं, झाडाझुडूपांचं, वनराईचं, पानाफुलांचं, पक्षी-प्राण्यांचं लेखकाने केलेलं अप्रतिम वर्णन त्याच्या निसर्गच्या अभ्यासाचं आणि सूक्ष्म निरीक्षणदृष्टीचं प्रत्यंतर घडवतं. इन्स्पेक्टर माहीसह कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखा लेखकाने जिवंत केल्या आहेत. कादंबरीचा शेवट एकीकडे आशा पल्लवित करणारा तर दुसरीकडे उद्विग्न करणारा आहे. लेखकाने या कादंबरीतून नक्षलवादी चळवळीविषयी आणि तिच्या अतिरेकाविषयी तिचा वेळीच बंदोबस्त न केल्यास आपल्याच आदिवासी बांधवांवर अन्याय केल्यासारखं होईल, हे विदारक वस्तुस्थितीचं वास्तव कादंबरीरूपात दाखवून संभाव्य धोक्याची जाणीव प्रत्ययकारीपणे करून दिली आहे.

नक्षलबारी (कादंबरी)
लेखक – सुरेश पाटील,
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे.
पृष्ठs – 624, मूल्य – रु. 680