वेदनेचे विभिन्न पोत

261

>> नमिता दामले

दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे.

‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्न व वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. ‘शिक्षा’ ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱयाला शिक्षा देणाऱया अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱया एक माणसांच्या गोतावळय़ात व जबाबदाऱयांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवाळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. ‘खरेदी’मध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱया आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱया, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱया सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यार’मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळय़ात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात.

‘उद्ध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौनं’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे, परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. ‘श्यामची आजी’मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱयात शांतपणे तेवत राहणाऱया मंद ज्योतीशी नातं सांगते. ‘विश्वामित्राची तपश्चर्या’मधील अंजलीची संकल्पपूर्तीची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱया, कधी जीवनाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱया, गौनाचे गूढ उकलणाऱया, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱया आणि नजरेचे भान जपणाऱया या कथा सौम्य व रंजक आहेत.’

निःशब्दाचे मौन
लेखिका – दीप्ती जोशी
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठs – १०६
मूल्य – १४० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या