दु:खांना वाचा फोडणाऱया कथा

187

>> डॉ. कैलास दौंड

आजच्या मराठी कथालेखकांमध्ये राजेंद्र गहाळ हे लक्ष वेधून घेणारे नाव आहे. त्यांनी ‘कोंडी’, ‘दोन एकर’ या कथासंग्रहांनी मराठी कथेत योगदान दिलेले आहे. ‘पोशिंदा’ हा त्यांचा अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेला महत्त्वाचा कथासंग्रह आहे. ‘पोशिंदा’मधील सर्व कथांना लाभलेला ग्रामीण परिसर, तिथली भाषा, अजूनही टिकून असणारे आणि जागतिकीकरणाने डळमळीत होऊ पाहणारे संस्कार यांचे दर्शन घडते. अनेक बऱयावाईट स्वभावाच्या व्यक्तिरेखा कथेतून भेटतात. या बारा कथांमधून वेगवेगळे प्रसंग आणि त्यानिमित्ताने घडणाऱया मानवी स्वभावाच्या भल्याबुऱया छटा दिसतात.

‘मळय़ाची वाट’ ही या ‘पोशिंदा’मधील पहिलीच कथा. या कथेत वारकरी असणारा सालदार प्रामाणिक नाथा आणि त्याची पत्नी यांच्या भिन्न मानसिकतेचे दर्शन घडते. सरवा वेचायला जाऊन गरिबी असल्याने सरवा चोरणारी सीताबाई आणि तिची चोरी पकडल्यावर ‘तुझी चोरी तुझ्या चिल्यापिल्यासाठीच होती’ म्हणत तिला दोन घडे गहू देणारा बाबूकाका आणि त्याची पत्नी या कथेत येतात. भुकेला समजून घेणारा, एरवी दुर्मिळ असणारा शेतकरी इथे दिसतो, तर ‘सांजवेळ’ या कथेत दारूडय़ा परसू आणि कांता यांची मुलगी मिरी या त्रिकोणी कुटुंबातील परसू व्यसनी आहे. तो दळणासाठी ठेवलेले धान्यच दारू पिण्यासाठी विकून टाकतो. त्यातून भांडण करून तोच बायकोला मारायला सुरुवात करतो. कांता त्याला ढकलते. मग मात्र तो सद्वर्तनी होण्याचा, मरेपर्यंत दारूला हात न लावण्याचा निश्चय करतो. स्त्र्ााrच्या धीट होण्याने एका प्रसंगाने कुटुंबाची सुधारणा होते.

‘जिव्हाळा’ ही कथा कंजूष सावकार व त्याच्या पत्नीच्या जुलमी मानसिकतेची आणि प्रेमळ, सालदार मुलगा आनंदा यांची मनस्वी कथा आहे. सावकाराच्या बैलावर जीवापाड प्रेम करणाऱया सालदार मुलगा आनंदाला त्याची मालकीण त्याने पोळय़ा जास्त खाऊन नयेत म्हणून पोळय़ाच्या सणाच्या दिवशी तळलेले मूग खाऊ घालते. त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागते. बैल मात्र सावकाराच्या घरी खाणे तर सोडाच, पण पोळीकडे बघतही नाहीत. शारदा ही त्यांची मुलगी बैल आनंदाच्या घरी न्यायला सांगते. तसे करताच बैल आनंदाच्या हाताने पोळी खातात. ‘सोनामाय’ या कथेत गावातल्या पोरींची स्वतःच्या लेकरागत काळजी घेणारी आदर्शवत वाटेल अशी श्रीमंत शेतकरीण सोनामाय भेटते. प्रसंगी ती आपल्या मुलाला फटकारायलादेखील मागेपुढे पाहत नाही.

‘परिवर्तन’ ही तरुण स्त्र्ााrच्या कपटकारस्थानाची कथा. संगीता नावाच्या शेजारणीचे ऐकून आपल्या वारकरी, सत्शील सासऱयाला कलंक लावू पाहणारी रंजना या कथेची नायिका. ती शांताबाई नावाच्या कजाग बाईला स्वयंपाकासाठी ठेवते व सासऱयावर आळ घ्यायला लावते. निरपराध आणि निष्कलंक असणारा सासरा दादा मात्र या प्रसंगाने घरातून निघून जातो. पंढरपूर येथे मुलगा व सून यांना तो भेटतो. सून तिची चूक कबूल करते.

‘पोशिंदा’ कथेतील शेतकरी कष्टाळू आणि अगतिकतेचे प्रतीक ठरतो. यातील व्यापारी स्त्र्ााr बाजारू यंत्रणेची अव्वल प्रतिनिधी आहे. मात्र सुरेशसारखा शेतकरी कुटुंबातून आलेला मध्यमवर्गीय माणूस मेथीच्या दोन जुडय़ा विकत घेतल्या म्हणजे शेतकऱयाला मदत केल्याचे समजतो. ही मध्यमवर्गीयांची भूमिका आणि मानसिकता लेखकाने अत्यंत वास्तविकतेने मांडली आहे. ‘नियती’ या कथेत वैषम्य वाटणारी पार्श्वभूमी आपल्यासमोर येते. मीनाबाई नावाची आत्या आपल्या गरीब भावाच्या मुलीला शिक्षणासाठी आपल्यासोबत शहरालगतच्या वीटभट्टीवर नेते. तिथे ती स्वतःच अनैतिक संबंधात गुंतल्यामुळे ज्योतीचे संरक्षण करू शकत नाही. वाईट प्रसंगात सापडल्याने ज्योती स्वतः पेटवून घेते. स्त्र्ााजीवनाची शोकांतिका मांडणारी ही कथा आहे.

‘हिस्सा’ वडिलोपार्जित शेतीतील हिस्सा भावाला न देणारा कान्हू आणि त्याला अद्दल घडवण्याच्या वेळेला माया दाखवणारा महादू हा त्याचा भाऊ या कथेत भेटतो तर ‘परतफेड’ या कथेत आपल्या शेतकरी दिराच्या ‘आशा’ नावाच्या पोरीला शिक्षणासाठी नेल्यानंतर जीवघेणी शिक्षा करणारी अमृता नावाची चुलती भेटते आणि काहीही करू न शकणारा तिचा चुलता रामनाथ भेटतो. आशाचे आईवडील मात्र सच्चे शेतकरी असल्याचे या कथेत दिसते.

‘पोशिंदा’ कथासंग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. या कथांमधील संवाद, भाषा, प्रसंग उभी करण्याची ताकद कथांना सौष्ठव प्राप्त करून देतात. बहुतांश कथांचा शेवट कारुण्यपूर्ण असून काही कथा शोकांतिकेच्या पातळीवर जातात. बऱयाच कथांत वारकरी असणारे पारंपरिक, संस्कारशील एखादे पुरुष पात्र हमखास भेटते. मूल्य व्यवस्थेची पडझड अनेक कथांच्या मुळाशी दिसते. घटनाप्रधान असणाऱया याच्या कथा प्रभावी आहेत. तरीही ‘सोनामाय’सारख्या कथेला कथा म्हणायचे की वृत्तांत, हा प्रश्न उभा राहतो. वाचकांनी मुळातून वाचावा असाच हा कथासंग्रह आहे. आजच्या कथाविश्वातील महत्त्वाच्या कथाकाराच्या कथा वेगळाच अनुभव देऊन जातात. संतुक गोलेगावकर यांनी चितारलेले मुखपृष्ठ समर्पक आणि आकर्षक आहे.

पोशिंदा – कथासंग्रह
लेखक – राजेंद्र गहाळ
प्रकाशन – प्रतिभास प्रकाशन, परभणी
पृष्ठ- 120, मूल्य – 140 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या