व्याकुळतेचे चिरंतन सार…

2089

>> अरविंद दोडे

‘जिथे जळणे संपते, तिथे उजळणे सुरू होते’ हे त्रिकालाबाधित सत्य दाहक असते. ते स्वीकारणे जेव्हा अपरिहार्य ठरते, तेव्हा त्या सत्याची कविता होते. दुसऱ्यावर जळणे वेगळे आणि दुसऱ्यासाठी जळणे वेगळे. दोन्ही प्रकार वणव्यागत असले, तरी त्यांची कविता होणे आणखीनच वेगळे. मग चढत्या भाजणीने दीर्घ कविता, खंडकाव्य आणि शिखर म्हणजे महाकाव्य. समकालीन कवितेचा काळ महाकाव्याचा नसला तरी कवितेचा निश्चितच सुकाळ आहे असे ठामपणे सांगता येते. दीर्घकाव्यही क्वचितच वाचायला मिळते. ‘रुजवात’ हे त्याचेच एक उदाहरण आहे.

हे व्याकुळतेचे चिरंतन सार कसे आहे? प्रेम आणि वियोग यांच्या सीमारेषेवर फुललेली ही ‘रुजवात’ तो आणि ती या दोनच बिंदूंना जोडू पाहणारी एक अंतर्गत गझल आहे. मुक्तछंदाच्या या अरण्यात अनोळखी विचारांच्या वाटा आहेत. काटेरी कुंपणापल्याड अस्वस्थ नशीब आणि हतबल प्रयत्न यांचा नाजूक संघर्ष आहे. ‘जिथे सावरायचे होते तिथे फक्त आज नको उद्याचा ठेका/ जिथे झोकून मारायची उडी, तिथे अनावर हाका…’ एवढेच प्राक्तन नाही, तर कुठल्या तरी जन्माच्या संचितापायी परत परत सगळे मान्य करून घेण्याची मानसिक परिपक्वताही समजूतदारपणे वियोगाविरुद्ध विद्रोह करण्याचे टाळते की पेटून उठते हे समजून घेण्यासाठी वाचायला हवे. विखारी नजरांचा मारा सहन करण्याची सिद्धी सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण जेव्हा एक अनुत्तरित प्रश्न बनतो तेव्हा कोणत्या कोमल समस्या निर्माण होतात या प्रश्नाचे उत्तर देणारी ही कविता स्वतःचा स्वाहाकार स्वीकारते.

दीर्घ काव्याला चिंतनाची गंभीर बैठक लागते. घनदाट वेदनेचे घुसळण अनेक दिवस किंवा कित्येक वर्षे होत राहते. त्यानंतर जो एक दमदार झरा फुटतो तो थांबता थांबत नाही. कवीची दमछाक करणारा हा झरा पाच-पन्नास पाने ओली करूनच थांबतो. ‘प्रिय, मी सतत ‘नाही’ म्हणत गेलो, तू नेहमीच ‘हो’ म्हणत गेलीस, मग कधीतरी एकदा मी ‘हो’ म्हणालो आणि मला जाग आली.’ (अर्पण पत्रिका) त्या जागृतीची ही कविता प्रेमाची असली तर अशारीर प्रेमाच्या विश्वात घेऊन जाते. विचारमंथनातून अस्पर्शित शब्दांचे अमूर्त अर्थांचे कवडसे पाडते.

प्रा. अशोक बागवे यांच्या अभ्यासपूर्ण साक्षेपी प्रस्तावनेतून प्रस्तुत संग्रहाचे चिंतनात्मक मोल वाढले आहे. ‘प्रेमभावने’चे प्रत्येक बीज कसे मनाच्या मातीत फोफावते, याचा लोभस आविष्कार वाचनीय आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे, ‘झऱयाला ओंजळीत घेता येते, पण नदी कवेत मावत नाही. तरीही काठावर बसून नितळ तळय़ाचे गुपित हेरणे, किंबहुना पाण्यात उतरून त्यात आपला जीवात्मा विरघळवून टाकणे हे दीर्घ कवितेचे आस्वादन असावे.’ या विधानाचा आत्मप्रत्यय ‘रुजवात’ वाचताना येतो आणि काहीतरी उत्तम वाचल्याचा आत्मानंद प्राप्त होतो. श्रीवेद ग्राफिक्सचे मुखपृष्ठ कवितेच्या, धूसर प्रतिमेला साजेसे असून ‘संवेदना’ची ही निर्मिती मैलाचा दगड ठरू शकते.

रुजवात (दीर्घ कविता)
लेखक – सतीश सोळांकूरकर
प्रकाशन – संवेदना चिंचवडगाव, पुणे ३३
पृष्ठ – ४८
मूल्य – रुपये ७०

आपली प्रतिक्रिया द्या