रंजक स्थलयात्रा

>> देवेंद्र जाधव

आजपर्यंत अनेक महान व्यक्तींची प्रवासवर्णनं आपण सर्वांनी वाचली असतील. ही प्रवासवर्णनं रंजक तसेच प्रेरणादायीसुद्धा असतात, परंतु हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर खुद्द परमेश्वराचं वास्तव्य होतं असं मानलं जातं. आजही विष्णूच्या अवतारांची सर्वत्र पूजा केली जाते. याच अवतारांमधील एक म्हणजे परशुराम. गीता हरवंदे यांनी याच परशुरामांच्या अनोख्या यात्रेचं शब्दचित्र ‘श्री परशुराम स्थलयात्रा’ या पुस्तकात रेखाटलं आहे.

परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार. सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये परशुरामांबद्दल रंजक तसेच काहीशी अज्ञात माहिती मोजक्या शब्दांमध्ये लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. यामध्ये परशुरामांची पृथ्वी प्रदक्षिणा, परशुरामांची धनुर्धर म्हणून असणारी वेगळी बाजू, रावणाने परशुरामांना केलेली विनवणी, परशुरामांनी सागराला केलेले आवाहन अशा अनेक गोष्टी सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये लेखिकेने वर्णिल्या आहेत.

भारतभूमी ही परशुरामांच्या वास्तव्याने पावन झाली आहे. परशुरामांनी संपूर्ण हिंदुस्थानभर प्रवास केला. त्यामुळे हिमाचल प्रदेशपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत परशुरामांचे पावन स्पर्श त्या ठिकाणांना लाभले आहेत. या ठिकाणांचा विचार केला तर परशुरामांनी हिंदुस्थानची दोन्ही टोकं पादाक्रांत केली आहेत. लेखिकेने परशुराम अवताराची हीच वेगळी बाजू हेरून या पुस्तकाद्वारे परशुरामांनी केलेली स्थलयात्रा वाचकांना उलगडून दाखवली आहे.

ही स्थलयात्रा उलगडताना लेखिकेने हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू आदी हिंदुस्थानातील प्रमुख राज्यांचा समावेश केला आहे. एकूणच परशुरामांचे पावनस्पर्श जिथे जिथे लाभले तिथे स्वतः जाऊन लेखिकेने तेथील दुर्गम अशी परशुरामांची मंदिरं आणि तेथील आसपासच्या ठिकाणांचं निरीक्षण केलं आहे. हे निरीक्षण करताना त्यांनी परशुरामांच्या तपोस्थानांचासुद्धा अभ्यास केला आहे. या अभ्यासाला त्यांनी पुराणकाळातील आख्यायिकांची आणि संदर्भांची जोड दिल्याने या स्थलयात्रेला एक वेगळी रंजकता प्राप्त झाली आहे.

परशुरामांची ही स्थलयात्रा लेखिकेने स्वतः अनुभवल्याने एका विशिष्ट ठिकाणी कसं पोहोचायचं तसेच त्या त्या जागेचं महत्त्व काय आहे, तसेच मुख्य जागेसोबतच आसपासच्या प्रेक्षणीय ठिकाणांची माहितीसुद्धा लेखिका आपल्याला देतात. प्रत्येक स्थळाचं वर्णन करताना लेखिकेने वाचकांना आकलनास सोपे जावे म्हणून त्या ठिकाणचा नकाशासुद्धा पुस्तकात नमूद केला आहे. त्यामुळे ही स्थलयात्रा वाचतानाच संपूर्ण प्रदेशाचीसुद्धा सफर घडते.

या पुस्तकात लेखिकेने परशुरामांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला आहे. परशुरामांनी केलेले सूक्ष्म कार्यसुद्धा लेखिकेने लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून लेखिकेने केलेला अभ्यास जाणवतो. फक्त ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे तेथील छायाचित्रे लेखिकेने समाविष्ट करायला हवी होती.

परशुरामांनी संपूर्ण हिंदुस्थानात प्रवास केला. जिथे परशुरामांचं अस्तित्व होतं, तिथे त्यांच्या भक्तांनी किंवा नागरिकांनी त्यांची मंदिरं बांधली. परशुराम अवतारामधील अनेक अज्ञात आणि अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तसेच परशुरामांनी केलेल्या प्रवासवर्णनाचा अनुभव घेण्यासाठी ‘श्री परशुराम स्थलयात्रा’ हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगावं असं आहे.

श्री परशुराम स्थलयात्रा
लेखिका – गीता हरवंदे
प्रकाशन – प्रफुल्लता प्रकाशन
पृष्ठ – 168, मूल्य – 170 रुपये